
सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गावरील वाढे आणि वडूथ गावाजवळील वेण्णा व कृष्णा नदीवरील ऐतिहासिक दगडी कमानीच्या पुलांची संरचनात्मक स्थिती पावसाळ्यामुळे खालावली आहे. यामुळे दोन्ही पुलांवरून अवजड वाहतूक बंद करण्यात येत असल्याचा आदेश सातारा पोलिसांनी दिला आहे. दि. 28 सप्टेंबर मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून दि. 20 जून 2027 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत हे वाहतूक नियोजन लागू राहणार आहे.
एनएचएआयने दोन्ही पुलांची पाहणी केली असून, यामध्ये पुलांमध्ये पाणी पाझरणे, किरकोळ संरचनात्मक तडे तसेच कमानीच्या भागात झीज झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
यामुळे वाहतुकीत पोलिसांनी बदल केला आहे. लोणंदकडून साताराकडे येणारी अवजड वाहने खंडाळा, शिरवळमार्गे पुणे – बंगळूर महामार्गावरून साताराकडे जातील. साताराकडून वाढे फाटामार्गे लोणंद, फलटणकडे जाणारी वाहनेही पुणे-बंगळूर महामार्गावरून खंडाळा, शिरवळमार्गे वळवण्यात आली आहेत.
साताराकडून फलटणकडे जाणारी अवजड वाहने बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून कोरेगाव, पुसेगाव, ताथवडे घाटमार्गे जातील. फलटणकडून साताराकडे येणारी वाहनेही याच मार्गाने येतील. आदर्कीमार्गे येणाऱया अवजड वाहनांसाठी आदर्की फाटा, वाठार, पिंपोडे बु., सर्कलवाडी, शिरगाव घाट, जोशी विहीर मार्गे पुणे-बंगळूर महामार्ग किंवा आदर्की फाटा-लोणंद – खंडाळा, शिरवळमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
एसटी, स्कूल बसला पुलावरून परवानगी
n एसटी बसेस, स्कूल बसेस तसेच आवश्यक सेवांशी संबंधित जड वाहनांना या दोन्ही पुलांवरून ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हलक्या वाहनांच्या वाहतुकीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून ती पूर्वीच्या मार्गान सुरू राहणार आहे. नवीन समांतर पुलांचे बांधकाम एनएचएआयकडून सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर जुन्या पुलांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची शक्यता आहे. वाहनचालकांनी बदललेल्या मार्गाची नोंद घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





























































