इचलकरंजीत ‘कचरा उठावो’ संशयाच्या भोवऱ्यात, वर्कऑर्डर देण्याची घाई कशासाठी; उदयसिंह पाटील यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इचलकरंजी शहराच्या विविध भागांत घरोघरी जाऊन घंटागाडीतून कचरा संकलन करण्याचे 22 कोटींचे टेंडर हे कसलेही नियोजन नसताना भ्रष्ट कारभारावर आधारित असून, ठेकेदारास टेंडरची वर्क ऑर्डर देण्याची घाई केली जात असल्याचा आरोप इचलकरंजी मनपा विरोधी पक्षाचे गटनेते उदयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. कचरा संकलनाच्या टेंडरमध्ये अकारण वाढ करण्यात आली असून, येत्या 1 ऑक्टोबर रोजी या टेंडरची वर्क ऑर्डर ठेकेदारास दिली जाणार आहे. महापौर धातुंडे यांच्या या घोषणेच्या पार्श्वभूमीवर मनपा कार्यालयात अधिकाऱयांकडे कोणत्याही फाईल किंवा कागदपत्रे नाहीत, असा गंभीर आरोप उदय पाटील यांनी केला आहे. टेंडरबाबत कोणतीही फाईल किंवा कागद नाहीत. चौकशीसाठी फोन केला तर अधिकारी सापडत नाहीत आणि संपर्क झाला तर कागद नाहीत. मग मनपाचा कारभार कुणाच्या इशाऱयावर चालतो, असा सवाल त्यांनी केला आहे.

शहरात कचरा संकलनासाठी 80 घंटागाडय़ा उपलब्धच नाहीत, कचरा डेपोवर मशिनरी, वजन काटा बंद आहे, त्यांची दुरुस्ती किंवा नवीन घेणार असाल तर त्यांच्या ऑर्डर प्रक्रियांचे कागद नाहीत. तसेच कर्मचारी भरतीच झालेली नाही. मग वर्कऑर्डर देण्याची घाई कशासाठी? यातील कारभार पारदर्शी पाहिजे. या शिवाय अंदाजपत्रकात एक कोटी रुपये आकस्मिक खर्च तरतूद कोणत्या आधारे करण्यात आला, याचे स्पष्टीकरण झाले पाहिजे, असा आग्रहदेखील उदयसिंह पाटील यांनी धरला आहे. सध्या एनडीके ही कंपनी कार्यरत असून, तिला मनपाने 22 रोजी पत्र देऊन काम बंद करण्याचे आदेश दिल्याचे दाखविले आहे.

याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे आणि नगरसेवक अमर जाधव आदींनीदेखील या टेंडरवर आक्षेप घेतले आहेत.

सत्ताधारी भाजप आयुक्तांच्या हातचे बाहुले

– उदय पाटील म्हणाले, कचरा संकलनाचे काम 14 कोटींचे धरले आहे, तर काहींनी हे काम साडेनऊ ते दहा कोटी रुपयांत करण्यास तयार असल्याचे कळविले आहे. यात महापालिकेचा चार कोटींचा फायदा होईल, पण याकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वीच्या कंपनीने न केलेले 3.81 कोटींचे काम आता पाच कोटींना दिले आहे. यामुळे 8 कोटी 81 लाखांचा बोजा मनपावर लादला जात आहे, असा आरोप करत सत्तारूढ भाजपचे नगरसेवक आयुक्त मॅडमच्या हातचे बाहुले बनले आहेत, असा टोला उदय पाटील यांनी लगावला.

बोगस व्यक्तीशी केला करार

– नगरसेवक अमर जाधव यांनी कचरा संकलनाबाबत बोगस माणसाशी करार केल्याचा आरोप करत याची पोलखोल करणार असल्याचे सांगितले. याबाबत हरियाणातील तीन ठेकेदार कंपन्यांनी टेंडर भरले आहे. यातील श्री बालाजी केअर टेकर कंपनीने (रोहतक) 2ः35 टक्के कमी म्हणजे 21 कोटी 65 लाख 92 हजार 971 रुपयांचे टेंडर आहे, तर दुसरी कंपनी पूजा कन्सुलेशन कंपनी (सोनिपत) व तिसरी शाम असोसिएट्स जिंदची आहे. यापैकी एकाचा मालक मयत आहे. तर मनपाशी करार बोगस माणसांशी झाला आहे. याचा भांडाफोड लवकरच करणार आहे, असे नगरसेवक अमर जाधव यांनी सांगितले.