
सार्वजनिक शौचालयात गुदमरून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज गोरेगाव पूर्व येथे घडली. भावीन देसाई आणि प्रभाकर धीवर अशी मृतांची नावे आहेत. शौचालयाच्या बाजूला प्लेटिंग वर्पशॉपमधून बाहेर पडणाऱ्या विषारी धुरामुळे त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र नेमका कशामुळे मृत्यू झाला हे स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी वनराई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
गोरेगाव पूर्वच्या राम मंदिर रेल्वे स्थानक पूर्व येथे शिवशंकर नगर आहे. तेथे एक स्थानिक गणपती मंडळ आहे. मंडळाचे सहा सदस्य आणि भावीन, प्रभाकर हे मिळून मंडप उतरवण्याचे काम करत होते. ते सहा जण जेवण करत असताना भावीन आणि प्रभाकर हे दोघे सार्वजनिक शौचालयात गेले होते. 15 मिनिटे उलटून गेल्यानंतर ते दोघे बाहेर आले नाहीत. इतरांनी दरवाजा ठोकला तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्या दोघांना उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. तेथे त्या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी त्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिद्धार्थ रुग्णालयात पाठवले आहेत.
दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. पोलिसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. शौचालयाजवळील चेंबर (जे प्लेटिंग युनिटकडे जातात) त्यातून बाहेर पडणाऱ्या सल्फ्युरिक ऑसिडच्या धुरामुळे ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची माहिती समजताच वनराई पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी त्या युनिटला भेट दिली. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.




























































