दिल्लीत भाजपच्या मंत्र्याची भाईगिरी, रस्ता हाताने उखडून दाखवल्याने तरुणाच्या कानशिलात लगावली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विकासाच्या पोकळ दाव्यांची आणि भ्रष्ट कारभाराची पोलखोल होऊ लागल्याने भाजपचे नेते, मंत्री बिथरले आहेत. जाब विचारणाऱ्या जनतेवरच भाईगिरी करू लागले आहेत. नव्याने बनवण्यात आलेला एक रस्ता लोकांनी हाताने उखडून दाखवल्यामुळे तीळपापड झालेले दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री प्रवेश वर्मा यांनी रविवारी एका तरुणाला कानफटात मारली. या घटनेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे.

प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या टिळक नगर परिसरातील नव्याने बांधलेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. टिळक नगर विधानसभा मतदारसंघाचे आम आदमी पक्षाचे आमदार जर्नेल सिंग हेही तिथे पोहोचले. त्यांनी रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार मंत्र्यांकडे केली. वर्मा काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे तेथील लोकांनी पुरावा म्हणून हाताने रस्त्यावरील डांबर उखडून दाखवले. विकासकामांचा पर्दाफाश झाल्यामुळे प्रवेश वर्मा यांचा तीळपापड झाला. आम्ही रस्ता बांधला हे काय कमी आहे का, असा उलट प्रश्न वर्मा त्यांनी केला. त्यावर, हा विकास आम्हाला नकोच होता, असे लोकांनी सुनावले. निरुत्तर झालेल्या वर्मा यांनी तेथून काढता पाय घेतला.

लोक त्यांना सोडायला तयार नव्हते. त्यावेळी काही लोक मोबाईलवर व्हिडीओ चित्रण करत होते. संतापलेल्या प्रवेश वर्मा यांनी त्यातील एका तरुणाच्या थेट कानशिलात लगावली. पोलिसांच्या समोरच वर्मा यांनी हा हल्ला केला. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. लोकांनी वर्मा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पीडित तरुणाने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

प्रवेश वर्मा यांना अटक करा – केजरीवाल

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत भाजपवर जोरदार हल्ला केला. ‘भ्रष्टाचाराचा जाब विचारला म्हणून मंत्री गुंडगिरी करतात. मोदींनी कसल्या लोकांना मंत्रिपदे देऊन ठेवली आहेत. गुंडगिरी करणाऱ्या प्रवेश वर्मा यांना तत्काळ अटक झाली पाहिजे,’ अशी मागणी केजरीवाल यांनी केली.