Dapoli News – मुरुड समुद्र किनाऱ्यावरील चेंजिंग रुम जमिनदोस्त ; पर्यटकांची होतेय गैरसोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली येथील पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटनाचे ठिकाण असलेल्या मुरूड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या चेंजिंगरूम पूर्णतः जमीनदोस्त झाल्याने येथे आलेल्या पर्यटकांची मोठीच गैरसोय होत आहे.

दापोली तालुक्यातील मुरूड हे गाव पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. अशा या गावातील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या एक महिलांसाठी तर दुसरी पुरुषांसाठीच्या अशा दोन्ही चेंजिंगरूम पूर्णतः जमीनदोस्त झाल्या आहेत. महिला पुरुषांच्या स्वतंत्र असलेल्या या दोन्ही चेंजिंगरूममध्ये स्वतंत्र अशा प्रकारची शौचालये, बाथरूम, मुताऱ्या आणि कपडे बदल्यासाठी स्वतंत्र रूम होत्या.

मुरूड येथील स्वच्छ सुंदर आणि विस्तीर्ण अशा समुद्रकिना-यावर भटकंतीसाठी आलेल्या कोणाही पर्यटकाला येथील समुद्राच्या पाण्याला आलेल्या भरती ओहोटीच्या लाटांनी फेसाळणारा निळाशार स्वच्छ समुद्र पाहताच पाण्यात पोहण्याचा मोह होतो. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील चेंजिंगरूमचे महत्त्व अधिक होते. कारण येथे भटकंतीसाठी आलेल्यांना आपल्या लघुशंका उरकावयाच्या असल्यास या चेंजिंगरूमचा उपयोग होत होता. तसा तो पाण्याने भिजलेले अंगावरील ओले कपडे बदलण्यासाठी उपयोग होत होता.आता त्याच चेंजिंगरूम जमीनदोस्त झाल्याने पर्यटकांची मोठीच गैरसोय होत आहे.

पर्यटनातून विकास हे ब्रिद घेऊन चालणाऱ्या शासनकर्त्यांनी येथील पर्यटन वाढले पाहिजे यासाठी आणि त्याशिवाय येथे असलेल्या सोयीसुविधांच्या कमतरतेच्या गरजा पर्यटनवाढीच्या दृष्टीने पूर्ण करण्यासाठी अधिक लक्ष देणे काळाची गरज आहे. मात्र तसे होताना अजिबात दिसत नाही. येथील रस्ते, पाण्याच्या सुविधा, दिशादर्शक फलक, धोका सांगणारे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नामफलक, समुद्राच्या पाण्यात उतरलेल्या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा वॉच टॉवर , लाईफ जॅकेटची सुविधा , पोलीस मोबाईल व्हॅन, वाहतुक कोंढी सुरळीत करण्यासाठी सुरक्षा रक्षक आदी विविध समस्या प्राधान्याने सुरू करण्यास शासनकर्त्यांना सोयीस्कररीत्या विसर पडला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम हा पर्यटनवाढीवर होत आहे. पर्यटनवाढीवर झालेला परिणाम रोजगार निर्मिती घटण्यास पुरेसा ठरत आहे.

  • पाण्यात उतरण्याचा मोह होत असलेले पर्यटक हे स्थानिकांकडून माहिती घेत काहीजण समुद्राच्या पाण्यात उतरतात, मात्र समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या काही पर्यटकांचे उतरण्याचे निवासाचे ठिकाण हे समुद्रकिनारपट्टीपासून फारच दूर असते, तर काही जण हे मुरूडबाहेरील हॉटेलमध्ये राहिलेले येथे समुद्र पर्यटनासाठी येत असतात आलेले असतात. तेव्हा त्यांना ओल्या कपड्यांशी इतरत्र भटकंतीसाठी अथवा आपल्या उतरलेल्या ठिकाणाजवळ जाणे गैरसोयीचे होते.