Uttarakhand Rain – मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये भूस्खलन, 4000 यात्रेकरू अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रुद्रप्रयागमध्ये भूस्खलन सुरू आहे. भूस्खलनामुळे महामार्गावर ढिगारा साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे सुमारे 4000 यात्रेकरू अडकले आहेत. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. परिणामी, प्रशासनाने पुढील सूचना मिळेपर्यंत केदारनाथ यात्रा स्थगित केली आहे, तर हेलिकॉप्टर सेवा आधीच स्थगित करण्यात आली आहे. हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये दिवसभर मुसळधार पावसाचा रेड अलर्टही जारी केला आहे.

बद्रीनाथ महामार्गावर भूस्खलन

उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये सततच्या पावसामुळे, बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील शिरोबागड येथे मोठ्या प्रमाणात ढिगारा आणि दगड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, हजारो प्रवासी अडकून पडले. शिरोबागडमधील डोंगरावरून सतत कोसळणाऱ्या ढिगाऱ्यामुळे महामार्ग पुन्हा सुरू करण्याचे आव्हान आहे.

या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने उत्तराखंडमधील टिहरी, हरिद्वार, डेहराडून आणि पौरी येथे रेड अलर्ट जारी केला आहे. नैनिताल, रुद्रप्रयाग, चमोली आणि उत्तरकाशी येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अल्मोरा, चंपावत, पिथोरगड, उधम सिंग नगर आणि बागेश्वर येथे यलो रेन अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.