
नेपाळमधील पश्चिम भागात असलेल्या हिमलुंग हिमालच्या बेस कॅम्पवर रविवारी सकाळी हिमस्खलनाची घटना घडली. या दुर्घटनेत किमान 10 जण बेपत्ता झाल्याची माहिती मोहिमेच्या आयोजकांनी दिली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये मोहिमेच्या आयोजक मिंगमा ग्यालजे शेर्पा यांच्या दोन स्वयंपाकी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. हिमलुंग हिमाल हा तिबेटच्या सीमेजवळील मनांग जिल्ह्यात असून, त्याची उंची 7 हजार 126 मीटर आहे. या पर्वतावर चढाईसाठी गेलेल्या विविध मोहिमांमधील सदस्य या दुर्घटनेत बेपत्ता झाले आहेत.
मिंगमा ग्यालजे शेर्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हिमस्खलन झाले. हवामान विभागाने गेल्या आठवड्यातच खराब हवामानाचा इशारा दिला होता. त्यानंतर गिर्यारोहक आणि दोरखंड बसवणाऱ्या पथकांनी पर्वताच्या उतारावरून माघार घेतली होती. मात्र, काही जण तिथेच थांबले होते.
हिमलुंग हिमाल परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे शरद ऋतूतील गिर्यारोहण मोहिमा थांबवण्यात आल्या होत्या. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे नेपाळमध्ये मुसळधार पाऊस आणि पर्वतीय भागांत बर्फवृष्टी सुरू आहे.
प्रतिकूल हवामानामुळे नेपाळमधील अनेक रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली असून, काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. हवामान बिघडत असल्याने पर्यटन विभागाने गिर्यारोहक आणि ट्रेकर्सना मोहिमा स्थगित करण्याचे आवाहन केले आहे असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. नेपाळमधील मनास्लू आणि धौलागिरी पर्वतांवरील गिर्यारोहण मोहिमांनाही खराब हवामानाचा फटका बसला आहे. अनेक ट्रेकिंग मार्गांवरील वाहतूक आणि पर्यटन उपक्रम विस्कळीत झाले आहेत.























































