देशाच्या इतिहासातला मोठा मोर्चा 4 तारखेला जगाला पाहता येईल – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या देशामध्ये निवडणूक आयोगाविरोधात जे वातावरण आहे, त्याविरोधात शिवसेने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 4 आॅक्टोबरला जनमोर्चा निघणार आहे. यावर माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले, हिंदुस्थानच्या इतिहासातला सर्वात मोठा मोर्चा असणार आहे. हा मोर्चा संबंध जगाला पाहता येईल.

या संदर्भात अधिक बोलताना राऊत म्हणाले, चार तारखेला जनमोर्चा काढून आपण महाराष्ट्राची ताकद दाखवावी यावर आमचं एकमत झालं. परंतु दोन आॅक्टोबरला अभिजीत दिपके यांचा जो कार्यक्रम आहे त्याला देखील शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. तो एक स्वतंत्र अराजकीय कार्यक्रम आहे. अभिजीत दिपके यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांचा पहिल्या दिवसापासून पाठिंबा आहे आणि तो यापुढेही राहिल.

शिवसेना, मनसे यांच्यासह महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रीय पक्षांना आवाहन करण्यात येईल. आपण एकत्रित सरकारच्या विरोधात आवाज उठवणे हे गरजेचे आहे. या आंदोलनाची तयारी सुरु झालेली आहे आणि मला असं वाटतं की, हिंदुस्थानच्या इतिहासातला मोठा असा निवडणूक आयोगाच्या विरोधातला मोर्चा चार तारखेला देशाला आणि जगाला पाहता येईल असे यावेळी राऊत म्हणाले.

मोर्चामध्ये काॅंग्रेसच्या सहभागाविषयी बोलताना, संजय राऊत म्हणाले की, हा सर्वांचाच विषय आहे. राहुल गांधी सातत्याने या विषयावर काम करताहेत, बोलताहेत जनजागृती करताहेत. उद्धव ठाकरे देखील या विषयावर सातत्याने जनजागृती करत आहेत. राज ठाकरे यांनी देखील या विषयावर कायम बोलले आहेत. सगळेच पक्ष या विषयावर बोलताहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वांनी एकत्र यावे अशी दोन्ही ठाकरे बंधूची इच्छा आहे. त्यानुसार आम्ही इतर सर्व पक्षांशी मिळून चर्चा करू.

4 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाविरोधात जनमोर्चाची हाक दिली आहे. आम्ही ज्ञानेश कुमारला उचलून फेकून देणार, असा तानाशाह चुनाव आयोगाचा मुख्य राहू शकणार नाही.