पाकिस्तानला दहशतवादाचे परिणाम भोगावे लागतील; संयुक्त राष्ट्रात शाहबाज यांच्या युद्धाच्या धमकीनंतर हिंदुस्थानचा कठोर इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सिंधू नदीच्या पाण्यावरून थेट युद्धाची उघड धमकी दिली. याशिवाय ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानी लष्कराने हिंदुस्थानला धडा शिकवल्याचाही दावा केला. त्यावर हिंदुस्थानने चोख प्रत्युत्तर देत शरीफ यांच्या सर्व दाव्यांची पिसे काढली. पाकिस्तान हे सैन्याच्या तालावर नाचणारे बाहुले असून नष्ट झालेल्या धावपट्टय़ा आणि जळालेले हँगर्स हा पाकिस्तानसाठी विजयच असेल तर ते काल्पनिक विजयाचा आनंद साजरा करायला मोकळे आहेत, अशा शब्दांमध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदुस्थानच्या फर्स्ट सेक्रेटरी पेटल गेहलोत यांनी शरीफ यांच्या भाषणाची लक्तरे टांगली. पाकिस्तानला दहशतवादाचे परिणाम भोगावे लागतील. जम्मू आणि कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असल्याचे अधोरेखित करताना पाकव्याप्त कश्मीरमधील परिस्थिती संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून पेटल गेहलोत यांनी जगासमोर मांडली.

शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत केलेल्या भाषणात सिंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित करत थेट युद्धाची धमकी दिली. तसेच कश्मीरचा मुद्दा उपस्थित करत कश्मीरचा पाकिस्तानची ‘ज्युगुलर वेन’ (मानेतील मुख्य रक्तवाहिनी) असा उल्लेख केला. फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्याचा दावा शरीफ यांनी केला. त्यावर हिंदुस्थानने प्रत्युत्तराचा अधिकार वापरून जोरदार प्रत्युत्तर देत पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानला दहशतवादाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला.

सैन्याची, सैन्याकडून सैन्यासाठी चालविणारी व्यवस्था पाकिस्तानमध्ये असून ते केवळ सैन्याच्या हाताखालचे बाहुले आहे. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या ‘9/11’च्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानी लष्कराच्या मुख्य अकादमीजवळच आश्रय घेऊन राहत होता हे विसरता येणार नाही, असे पेटल गेहलोत म्हणाल्या.

विजयाच्या दाव्याची काढली हवा

पेटल गेहलोत यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानच्या विजयाच्या दाव्यांमधील हवाच काढली. त्या म्हणाल्या, उपग्रहाद्वारे मिळालेली छायाचित्रे आणि संपूर्ण जगाला उपलब्ध असलेले पुरावे हे सिद्ध करतात की, भारतीय कारवाईदरम्यान पाकिस्तानच्या लष्करी हवाई तळांचा नाश झाला होता. नष्ट झालेले धावपट्टय़ा आणि जळालेले हँगर्स हा पाकिस्तानसाठी विजय असेल तर ते या ‘काल्पनिक विजयाचा’ आनंद साजरा करण्यास मोकळे आहेत. पाकिस्तानच्या लष्करानेच स्वतःहून युद्धविरामाची विनंती केली होती. ही बाब संपूर्ण जगाला माहीत आहे, असे गेहलोत म्हणाल्या.