
हल्ली खासगी आयुष्यातील प्रत्येक घडामोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचा आणि लाईक्स मिळवायचे हा ट्रेंड सुरू आहे. मात्र सोशल मीडियावर खासगी आयुष्याचा दिखावा करणे कधी कधी महागात पडू शकते. अशीच एक घटना तामिळनाडूतील कन्याकुमारीत घडली आहे. सोशल मीडियावर लक्झरी लाईफ आणि श्रीमंतीचा दिखावा करणाऱ्या एका यूट्युबरला चोरट्यांनी लुटले आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, कन्याकुमारीमधील युट्युबर मधुमिताच्या घरात घुसून चोरट्यांनी तब्बल एक कोटींचे सोने आणि रोकड लुटून नेले. नागरकोविलजवळील थम्मथुकोनमच्या व्हीआयपी गार्डन परिसरात ही घटना घडली. युट्युबर मधुमिता याच परिसरात तिचा पती विनोद कुमारसोबत राहते. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी काही अज्ञात व्यक्तींनी घराच्या मागच्या बाजूने येऊन दरवाजा तोडला आणि घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी घरात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड चोरली आणि फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच राजक्कमंगलम पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. घर आणि आजूबाजूच्या परिसराची झडती घेण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. पोलीस सखोल तपास करत आहेत. विनोद आणि मधुमिता यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. मधुमिताच्या सोशल मीडियावरील कंटेटमधून त्यांची आलिशान जीवनशैली दिसून येते.





























































