
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोदवली नजीक भरधाव मालवाहू कंटेनर दुभाजकाला धडकून उलटला. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात कंटेनर चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून गोव्याच्या दिशेने माल घेऊन जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, कोदवली परिसरातील वळणावर हा कंटेनर थेट महामार्गाच्या दुभाजकाला जाऊन आदळला आणि रस्त्यावरच कलंडला. हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरच्या धडकेमुळे दुभाजकाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर रस्त्यावर माती आणि साहित्याचा राडारोडा पसरला होता. मात्र, एवढ्या मोठ्या अपघातातही चालकाला केवळ किरकोळ दुखापत झाल्याने मोठा अनर्थ टळला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना तात्काळ माहिती दिली. राजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.




























































