
हिंदुस्थानचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याला पुन्हा दुखापत झाली आहे. पंड्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो किमान तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. दुखापत गंभीर असल्याने न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि वन डे मालिकेलाही त्याला मुकावे लागणार आहे.
नुकत्याच केलेल्या तपासणीमध्ये हार्दिक पंड्या याच्या उजव्या पायाच्या पुढील भागातील हाडाला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय पथकाने त्याला दोन आठवडे पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीचे प्रमुख डॉ. दिनशॉ परडीवाला सध्या जपानमध्ये आहेत. जपान दौऱ्यावरून परतल्यानंतर हार्दिकच्या तपासणी अहवालांची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर पुढील आराखडा ठरवला जाईल, अशी बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
हार्दिक पंड्या हा पुन्हा मैदानावर उतरण्यासाठी सज्ज होता. 6 ऑक्टोबरपासून ‘ऑस्ट्रेलिया अ’ संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या वन डे मालिकेसाठी ‘हिंदुस्थान अ’ संघात त्याची निवड करण्यात आली होती. यानंतर तो टीम इंडियासोबत न्यूझीलंड दौऱ्यावरही जाणार होता. या दौऱ्यात दोन्ही उभय संघात टी-20 आणि वन डे मालिका खेळली जाणार आहे. 22 ऑक्टोबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार असून त्यानंतर वन डे मालिका खेळवली जाईल. मात्र तत्पूर्वीच हार्दिकला दुखापत झाल्याचे समोर आल्याने तो या दौऱ्याला मुकणार आहे.
STORY | Hardik Pandya suffers fresh shin injury, out of New Zealand series
Senior all-rounder Hardik Pandya has sustained a fresh injury to his right shin which is all set to rule him out of competitive cricket for at least three weeks including the white ball tour of New… pic.twitter.com/rjDL4RPCsZ
— Press Trust of India (@PTI_News) September 26, 2026
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी बीसीसीआयने हार्दिकला जपानला जाणाऱ्या संघात समाविष्ट करण्याचे ठरवले होते आणि त्याच्या व्हिसासाठी पासपोर्टही जमा केला होता. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी क्षेत्ररक्षणाचा सराव करताना त्याच्या पायात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मिळण्याच्या बेतात असतानाच त्याला पुन्हा वेदना जाणवू लागल्या आणि स्कॅनमध्ये दुखापत उघडकीस आली.
हार्दिक पांड्या आयपीएल संपल्यापासून बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सराव करत आहे. परंतु, गेल्या चार महिन्यांत त्याला तीनदा वेगवेगळ्या दुखापतींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्याचा पुनरागमनाचा मार्ग खडतर झाला आहे. न्यूझीलंड मालिकेतून बाहेर पडल्यामुळे आता हार्दिकला झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची वाट पाहावी लागेल किंवा विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या अंतर्गत देशांतर्गत स्पर्धांमध्ये त्याला मैदानात उतरण्याची संधी मिळू शकते.


























































