अर्ध्या ठाण्यात उद्या पाणीबाणी, टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात नवी मशिनरी बसवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
water-cutting

ठाण्यासह भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर या तीन महापालिका क्षेत्रांना पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात वाढीव क्षमतेची नवी पम्पिंग मशिनरी बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुसऱ्या दिवशी रविवार सकाळी ९ पर्यंत अर्ध्या ठाण्यात पाणीबाणी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाने केले आहे.

टेमघर येथील जल शुद्धीकरण केंद्र अतिशय महत्त्वाचे आहे. शहाड येथील उल्हास नदीचे पाणी ९ किलोमीटर लांब मोठ्या पाइपलाइनने टेमघरला आणले जाते. टेमघर येथील जलशुद्धीकरण प्रकल्प अंदाजे ४० वर्षांपासून आहे. त्यामुळे येथील यंत्रणा आधुनिक करण्याचे काम सध्या हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत वाढीव क्षमतेची पम्पिंग मशिनरी बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी २४ तासांचा शटडाऊन घ्यावा लागणार आहे.

येथे पाणी नाही
इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावकरनगर, लोकमान्यनगर पाडा क्र. २, ३ व ४, चैतन्यनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वाघरीपाडा, रूपादेवीपाडा, रामनगर, सी.पी. तलाव, येऊर परिसर, घोडबंदर रोड, पातलीपाडा, वाकळकुम, ब्रह्मांड, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ, मुंब्रा रेतीबंदर या भागातील पाणीपुरवठा शनिवार सकाळी नऊपासून बंद ठेवण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.

कल्याण, डोंबिवलीत मंगळवारी शटडाऊन
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांतील विद्युत व यांत्रिक उपकरणांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी २९ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत कल्याण पूर्व आणि पश्चिम, कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, आटाळी आणि कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे तसेच डोंबिवली पूर्व आणि पश्चिम परिसराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.