
प्रवासादरम्यान हरवलेली वृद्धेची कपडय़ांची पिशवी आणि सोन्या-चांदीचे दागिने असलेला डबा कराड तालुका पोलिसांनी शोधून काढत परत केला. या पिशवीत सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल होता. पिशवी व मुद्देमाल परत मिळाल्याने वृद्धेने पोलिसांचे आभार मानले.
अंजना धोंडिराम कार्वेकर (वय 75, रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड) असे वृद्धेचे नाव आहे. अजना या 21 सप्टेंबर रोजी रेठरे बुद्रुक येथे प्रवास करत असताना त्यांचा सोन्या-चांदीचे दागिने ठेवलेला डबा आणि कपडय़ांची पिशवी हरवली होती. याबाबत त्यांनी 22 रोजी तक्रार दिली होती.
या घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी दूरक्षेत्राचे अधिकारी उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, सहायक उपनिरीक्षक अभय तावरे आणि हवालदार अमित पवार यांना घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचे आदेश दिले. पोलिसांनी वृद्ध महिला आणि तिच्या गतिमंद मुलीकडून घटनेबाबत माहिती घेतली. मात्र, दोघींनाही त्या कोणत्या रिक्षातून आल्या, कुठे उतरल्या किंवा पिशवी नेमकी कुठे राहिली, याबाबत स्पष्ट माहिती देता येत नव्हती.
पोलिसांनी रेठरे बुद्रुक येथे पोहोचण्याची वेळ निश्चित करून त्या कालावधीत गावात आलेल्या सर्व रिक्षांची तपासणी केली. संबंधित रिक्षाची खात्री केल्यानंतर परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये महिलेची पिशवी एका दुकानाजवळ बाहेरील बाजूस असल्याचे दिसून आले. पिशवी उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये दोन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पिशवी व मुद्देमाल परत मिळाल्याने वयोवृद्ध महिलेने पोलिसांचे आभार मानले. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील आणि पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी कराड पोलिसांचे अभिनंदन केले.






























































