
महाराष्ट्रात नव्हे, तर परदेशातही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली. लंडनच्या प्रसिद्ध हौन्सलो गणेशोत्सव मंडळाचा (एचजीएम ) गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला. यानिमित्ताने परदेशात भक्ती-श्रद्धेचा जागर आणि मराठमोळय़ा संस्कृतीचे नितांतसुंदर दर्शन झाले. ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषाने लंडनचे रस्ते दुमदुमले.
लंडनच्या हौन्सलो गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 19 वे वर्ष आहे. मूळचे बोरिवलीकर असलेले आणि लंडनमध्ये स्थायिक असलेल्या वैभव रावराणे यांनी मंडळाची स्थापना केली. उत्सवासाठी मंडळाचे सदस्य सोनाली बोरकर, सुजय सोहनी. महेश शेट्टी, हरीश पांडुळे यांनी मेहनत घेतली.
मंडळाची दोन लेझीम पथके
हौन्सलो गणेशोत्सव मंडळाची स्वतःची दोन लेझीम पथके आहेत. एक महिला-पुरुषांचे तर दुसरे मुलांचे. या दोन्ही पथकांचा कलाविष्कार यंदाच्या उत्सवात पाहायला मिळाला. तसेच विसर्जन सोहळय़ासाठी बर्मिंगहॅम येथून ढोल ड्रम्स नावाचे ढोलपथक सहभागी झाले होते. यंदा ऑनलाईन ड्रॉईंग स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ, फॅन्सी ड्रेस, हौन्सलो गॉट टॅलेंट, मेहेंदी ड्रॉइंग या स्पर्धा घेण्यात आल्या. त्याला आबालवृद्धांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला.



























































