दादर-पुणे शिवनेरीसाठी व्हॉट्सऍप तिकीटिंग सेवा, एसटी महामंडळाचा नवा प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर-पुणे-दादर मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या शिवनेरी (वातानुकूलित) प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने डिजिटल पाऊल उचलले आहे. या मार्गावर आता व्हॉट्सऍप तिकीटिंग सेवा सुरू करण्यात आली आहे. नव्या सुविधेमुळे प्रवाशांना तिकीट खिडकीवर रांगेत उभे न राहता मोबाईलवरून सहजपणे आसन आरक्षित करता येणार आहे.

एसटी महामंडळाने गुरुवारपासून डिजिटल सेवा सुरू केली असून 23 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच एका महिन्याच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे. ही सुविधा फक्त दादर-पुणे- दादर शिवनेरी प्रीमियम सेवा मार्गासाठीच उपलब्ध असेल. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतर प्रमुख मार्गांवरही सेवा विस्तारित करण्यात येईल, अशी माहिती सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी दिली. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील प्रवास अधिक सुलभ, गतिमान आणि पेपरलेस व्हावा यासाठी प्रवाशांनी डिजिटल सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

 आरक्षणाची प्रक्रिया

तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांनी सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये 8097030022 हा अधिकृत मोबाईल क्रमांक सेव्ह करावा. या नंबरवर व्हॉट्सऍपद्वारे `Hi’ असा संदेश पाठवावा. त्यानंतर उपलब्ध सूचनांनुसार प्रवाशांना आपली प्रवासाची तारीख, वेळ आणि आवडीचे आसन निवडून तिकीट आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करता येईल, असे महामंडळाने स्पष्ट केले.