
‘मुंबईचा राजा’ अर्थात गणेशगल्ली येथील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जनाचा तिढा अखेर सुटला आहे. मुंबईचा राजाचे विसर्जन यंदा पहिल्यांदाच खोल समुद्रात बार्जच्या सहाय्याने होणार असून त्यासाठी आवश्यक परवानगी अखेर मुंबई पोलिसांकडून मंडळाला देण्यात आली आहे.
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ यंदा 99 वे वर्ष साजरे करीत आहे. यंदा पहिल्यांदाच 22 फुटी भव्य ‘मुंबईचा राजा’चे विसर्जन गिरगाव चौपाटी येथे बार्जवरून थेट खोल समुद्रात करण्यात येणार आहे. यासाठी मंडळाला महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची परवानगी मिळाली; परंतु मुंबई पोलिसांची परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे खोल समुद्रातील विसर्जनाबाबत तिढा निर्माण झाला होता. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर विसर्जन मिरवणुकीचे नियोजन करूनही परवानगीचा प्रश्न निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले होते.
महापालिकेची तयारी
मुंबईत 67 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि 278 ठिकाणी 383 हून अधिक पृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विसर्जन सोहळा सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी महानगरपालिकेचे 25 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत राहतील.
विसर्जन स्थळांवर 1,194 स्टील प्लेट, 23 जर्मन तराफे, 34 व्रेन, 85 रुग्णवाहिका आणि 10 मोटरबोट सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
सुरक्षेसाठी 1 हजार 132 जीवरक्षक तैनात असून, 6 हजार 52 फ्लडलाईट/सर्चलाईटची व्यवस्था करण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी 498 निर्माल्य कलश आणि 326 निर्माल्य डंपर उपलब्ध आहेत.
विसर्जन स्थळांवर 261 स्वागत कक्ष, 228 नियंत्रण कक्ष आणि 75 निरीक्षण मनोरे आहेत.
भाविकांच्या सुविधेसाठी 489 तात्पुरती प्रसाधनगृहे तसेच आवश्यक प्रकाशयोजना व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत.
कोर्टाच्या निर्देशांनुसार सहा फूट उंचीपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक आहे.
सुनील प्रभू, अजय चौधरी यांचा पोलीस आयुक्तांना फोन
शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी संपर्क साधून मंडळाला परवानगी द्यावी अशी विनंती केली. आमदार अजय चौधरी, सांस्पृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनीही देवेन भारती यांच्याशी संपर्क साधला. अखेर पोलिसांकडून मंडळाला परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती मुंबईचा राजा मंडळाचे अध्यक्ष, नगरसेवक किरण तावडे यांनी दिली.
मुंबईचा राजाचा विसर्जन सोहळा सकाळी आठ वाजता सुरू होऊन सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत तराफ्यावरूनच होणार आहे, असेही मंडळाने सांगितले.






























































