
घाटकोपर पश्चिमेतील चिराग नगर येथे उभारण्यात येणाऱया साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या बांधकामासाठीच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाला आहे. लाडक्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी ही निविदा प्रक्रिया राबवली गेली असून, या संपूर्ण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब यांनी केली आहे.
अनिल परब यांनी 27 ऑगस्ट 2026 रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना यासंदर्भात पत्र लिहिले होते. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या बांधकामासाठीची निविदा मेसर्स स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मेसर्स आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट्स या पंत्राटदारांना फायदा होईल अशा पद्धतीने तयार करण्यात आली होती असा दावा त्यात केला होता. या दोन्ही पंपन्या परस्परांशी संबंधित असून ‘फ्रंट पंपन्या’ म्हणून कार्यरत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
आपल्या पत्रात परब यांनी नमूद केले की, निविदेतील अटीनुसार निविदाकाराला ‘पॅकेट बी’मध्ये विशेष शिल्पकार/कलाकाराची पात्रता तसेच संबंधितांसोबत केलेला सामंजस्य करार सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. पात्रतेचे निकष पूर्ण केले नाहीत तर संपूर्ण निविदा रद्द करण्याची तरतूद होती. निविदेत संबंधितांना संस्थेला भारत सरकारकडून पुरस्कार मिळालेला असणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले होते. या पुरस्कारांचा अर्थ पद्म पुरस्कार असा होतो. महाराष्ट्रात अशी पात्रता असलेली केवळ एकच पंपनी आहे. सर्व पात्र बोलीदारांना हे करार उपलब्ध करून दिले जात नव्हते. त्यामुळे निविदा प्रक्रियेत निविदाकारांचा सहभाग आणि स्पर्धा पूर्णपणे मर्यादित केली होती, असे आमदार परब यांनी म्हटले आहे.
प्रकरणाची चौकशी करा
31 ऑगस्ट 2026 रोजी मेसर्स स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर ही या प्रकल्पासाठी एल 1 निविदाकार ठरली. यातून सरकारी व्यवस्थेत भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे हे स्पष्ट होते, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या महान लोकशाहीराच्या नावाने उभारण्यात येणाऱया संस्थेच्या बांधकामाची निविदेत अनावश्यक आणि स्पर्धेला प्रतिबंध करणाऱया अटी घालून गैरव्यवहार करून मत्तेदारी निर्माण केली जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी परब यांनी केली आहे.






























































