
दुष्काळी परिस्थिती, शेतीतून अपेक्षित उत्पन्न नाही, डोक्यावर वाढत गेलेला कर्जाचा बोजा आणि त्यातच आजारपणाच्या उपचारांचा खर्च अशा आर्थिक विवंचनेतून खडकी (ता. अहिल्यानगर) येथील दीपाली प्रकाश रोकडे (वय 37) या शेतकरी महिलेने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आज पहाटे हा प्रकार निदर्शनास आला.
दीपाली रोकडे यांच्या कुटुंबाकडे चार एकर शेती आहे. शेती आणि मोलमजुरीच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, गेल्या काही दिवसांत कुटुंबावरील आर्थिक संकट वाढत गेले. दोन वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी घेतलेले पाच लाख रुपयांचे कर्ज, त्यानंतर अलाहाबाद बँकेचे एक लाख रुपये, सेवा सोसायटीचे सुमारे 40 हजार रुपये, तसेच खेळते भांडवल कर्जाचे 35 हजार रुपये असा कर्जाचा मोठा बोजा कुटुंबावर असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यातच काही दिवसांपूर्वी दीपाली यांच्यावर आजारपणामुळे उपचार करण्यात आले होते. उपचारांसाठी झालेल्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत आणखी भर पडली. यंदाच्या खरीप हंगामात पेरणी करूनही पुरेसा पाऊस न झाल्याने शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. याच पार्श्वभूमीवर दीपाली यांनी बुधवारी मध्यरात्री घराजवळील विहिरीत उडी घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आज पहाटे हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. दीपाली रोकडे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी आणि सासू असा परिवार आहे. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन मुलांच्या डोक्यावरून मातृछत्र हरपले आहे.






























































