
>> साधना गोरे
सध्या चाळिशी-पन्नाशीत असलेल्या पिढीला ‘गुलाम’ शब्द उच्चारला की आमीर खानचा याच नावाचा सिनेमा आठवण्याची शक्यता आहे. किंवा त्यातील ‘आती क्या खंडाला?’ हे गाणं तर नक्कीच आठवेल. आज आपण ‘गुलाम’ शब्द सेवक, नोकर या अर्थाने वापरतो; पण दक्षिण आशियाई मुस्लीम परंपरेत व्यक्तिनामांतही गुलामचा समावेश असलेला दिसतो. उदा. गुलाम अली, गुलाम नबी इ. त्यामुळे गुलाम शब्दाचा मूळ अर्थ आणि त्यात होत गेलेला बदल पाहणं मोठं रंजक आहे.
गुलाम शब्द मूळचा अरबी भाषेतील. अरबीत त्याचा उच्चार ‘घुलाम्’ असा आहे आणि त्याचा मूळ अर्थ होता – लहान किंवा पौगंडावस्थेतील तरुण. ‘पुराण’मध्येही हा शब्द याच अर्थाने वापरला गेला आहे. मग आज मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये ‘गुलाम’चा अर्थ सेवक, दास किंवा कामासाठी विकत घेतलेला माणूस, असा कसा झाला असेल? तर विविध इस्लामिक राजवटींच्या इतिहासाबरोबर या शब्दाच्या अर्थात बदल होत गेलेला दिसतो. खिलाफतीच्या काळात राजे किंवा खलिफा आपल्या महालात सेवेसाठी आणि संरक्षणासाठी तरुण मुलांना कामावर ठेवत. बरेचदा हे तरुण युद्धात पकडलेले किंवा विकत घेतलेले असायचे. ते अत्यंत राजनिष्ठ असायचे. त्यांना ‘घिल्मान’ म्हटलं जाई. ‘घिल्मान’ म्हणजे घुलाम्’चे अनेकवचन. इथं या शब्दाला ‘शाही सेवक’ किंवा ‘खास रक्षक’ असा अर्थ प्राप्त झाला.
इस्लाम राजवटीत ‘मामलुक’ किंवा ‘गुलाम’ नावाची एक मोठी लष्करी व्यवस्था होती. भारतात ‘गुलाम घराण्याची’ स्थापना करणाऱ्या पुतुबुद्दीन ऐबकसारख्या राजाने याच व्यवस्थेतून येऊन पुढे सत्ता मिळवली. या व्यवस्थेत लहान मुलांना विकत घेऊन त्यांना युद्धकलेचं कठोर शिक्षण दिलं जाई. यांतील काही जण नंतर राजे किंवा मोठे अधिकारी झाले असले तरी त्यांना ‘गुलाम’ म्हणूनच ओळखलं जाई. मूळ अरबी ‘घुलाम्’ फारसीत गेल्यावर त्याचा अर्थ ‘विकत घेतलेले तरुण’ असा झाला. फारसीमार्गे हा गुलाम शब्द ऊर्दू, हिंदीसह मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये आला, तेव्हा त्याचा संबंध ‘विकत घेतलेले तरुण’ एवढाच न राहता ‘मालकाच्या सेवेत असलेल्या आणि स्वतःचे स्वातंत्र्य नसलेल्या व्यक्तीशी’ जोडला गेला.
भारतात आधीपासूनच ‘दास’ ही संकल्पना होती. भारतातील मुस्लीम राजवटींत ‘गुलाम’ शब्द इतका प्रचलित झाला की त्याचा वापर भारतीय ‘दास’ या शब्दाप्रमाणे होऊ लागला. गुलाम अली म्हणजे अलीचा गुलाम किंवा दास, गुलाम नबी म्हणजे नबीचा गुलाम. ही आपल्याकडील रामदास, हरिदास या व्यक्तिनामांची वेगळी आवृत्ती होती. संत कबीराच्या एका रचनेत गुलाम आणि दास या दोन्ही शब्दांची फार अप्रतिम गुंफण केली आहे – “मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा। तूंचि मेरा सच्चा साई नाम लेऊं तेरा। रूप नहीं रंग नहीं नहीं बरन छाया। निर्विकार निर्गुनही तूंचि रघुराया। एक रोटी दे लंगोटी द्वार तेरा पावूं। काम क्रोध छोडकर हरीगुन गाऊं। मेहरबान मेहरबान मेहेर करो मेरी। दास कबीर चरन खडा नजर देख तेरी।
थोडक्यात सांगायचं तर, या गुलाम शब्दाचा अर्थ मुलगा – शाही सेवक/रक्षक – विकत घेतलेला सैनिक – पूर्णपणे परतंत्र असलेला माणूस – अशा क्रमाने बदलत गेला. भाषाविज्ञानात या प्रक्रियेला ‘अर्थापकर्ष’ म्हणतात. म्हणजे, एखाद्या शब्दाचा मूळ चांगला किंवा सामान्य अर्थ काळाच्या ओघात नकारात्मक किंवा दुय्यम होणे.
‘महाराष्ट्र शब्दकोशा’सह इतरही मराठी शब्दकोशांमध्ये या गुलाम शब्दाचा अर्थ – लुच्चा, वस्ताद, ठक, चोर, हरामखोर, लबाड – दिला आहे. आता हा म्हणजे अर्थापकर्षाचा अर्थापकर्ष म्हणायला हवा! गुलाम मनुष्याचे मानसशास्त्र समजून घेतले या अर्थाचा उलगडा होऊ शकेल. गुलामांना स्वतःचे कोणतेही अधिकार नसतात, शिवाय मालक अमानुष अत्याचार करत असतो. अशा परिस्थितीत मालकाच्या जाचातून सुटण्यासाठी गुलाम मनुष्य खोटं बोलणं, चोरी करणं, लपून छपून गोष्टी करणं इ. संरक्षणयंत्रणा वापरणं साहजिक आहे. मालकवर्गाने गुलामांच्या या वर्तनाला ‘लबाडी’, ‘लुच्चेपणा’ अशी नावं दिली असावीत. ‘गुलाम’ शब्द थेट ‘लबाड’ अर्थाने वापरल्याची एक म्हण आहे – ‘गुलामाला गुलाम झाल्याखेरीज संशय फिटत नाही.’ म्हणजे, लबाड मनुष्याशी लबाडी केल्याशिवाय त्याला अद्दल घडत नाही. लबाडाशी सरळ व्यवहार करून भागत नाही.
आपल्याकडे एखादा लहान मुलगा हुशार, पण वात्रट असेल तर त्यालाही काwतुकाने ‘गुलाम’ म्हटलं जातं. मराठीतल्या या अर्थाने मात्र मूळ अरबी अर्थाचे वर्तुळ पूर्ण केले आहे!































































