
<< सुनील कुवरे
नेपाळमधील तिबेट सीमेवरील हिमनदी कोसळून आलेल्या विनाशकारी महापुरामुळे हाहाकार उडाला. या विनाशकारी महापुराने हिमालयाच्या संवेदनशीलतेकडे पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधले गेले आहे. या महापुराची दृश्ये थरकाप उडवणारी इतकी महाभयंकर आहेत. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत सुमारे हजारो लोकांचा मृत्यू झाला असून, हा आकडा सतत वाढत आहे. त्याचबरोबर हजारो लोक बेपत्ता आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील तसेच देशविदेशातील पर्यटकांचा समावेश आहे. निसर्ग आपल्याला अधूनमधून इशारे देत असतो. निसर्ग जेव्हा कूस बदलतो तेव्हा होणारी उलथापालथ ही मानवासाठी नेहमी विनाशकारी असते. तरीही आपण त्यातून काही बोध घेत नाही किंवा शिकत नाही.
नेपाळमध्ये जे इतके भयंकर झाले की, लोकांना काय झाले ते समजलेच नाही. सुरुवातीला भूकंप झाला असे वाटले, पण हा भूकंप नव्हता. 5200 मीटर उंचीवरून हिमनदी कोसळली. या मोठ्या दुर्घटनेत 29 मोठे पूल रस्ते, घरे, इमारती वाहून गेल्या, तर जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाले आहेत. नेपाळमधील विनाशकारी महापुराने पुन्हा एकदा हिमालयातील पर्यावरणीय अस्थिरता, हवामान बदल, भूकंप आणि मोठ्या धरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केंद्रस्थानी आला आहे. हे केवळ नेपाळमध्ये घडले असे नाही. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आदी राज्यांत दरवर्षी भूस्खलनाच्या घटना घडत असतात. यातील बहुतांश घटना रस्तारुंदीकरण, बोगदे यामुळे होतात.
हा नैसर्गिक प्रकोप म्हणून अशा दुर्घटना नजरेआड करता येणार नाहीत. कारण अलीकडे भूकंप, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी आणि येणारे महापूर या घटना अपवाद नाहीत. नैसर्गिक कारणांबरोबरच मानवनिर्मित कारणांची भर पडली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीची तीव्रता आणि वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. तेव्हा आज हिमालयातील पर्यावरण, जैवविविधता, नैसर्गिक सौंदर्य याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वीही हिमालयात मुसळधार पाऊस पडत होता. नद्यांना पूर येत होता. मात्र, नैसर्गिक सृष्टी अबाधित होती. आता विकासाची गती नैसर्गिक सहनशक्तीपेक्षा अधिक झाली आहे. परिणामी निसर्गाचा समतोल ढासळत असून त्याचे दुष्परिणाम आता जाणवत आहेत. नेपाळमधील या महापुराचा फटका केवळ नेपाळपुरता मर्यादित नाही. हिमालयात निर्माण होणारी आपत्ती भौगोलिक सीमा ओळखत नाही. नेपाळमधून वाहणाऱ्या नद्या पुढे भारतात येतात आणि त्या गंगेच्या तसेच गंडकी नदीपर्यंत जोडल्या जातात. याचा फटका उत्तर प्रदेश आणि बिहारला बसू शकतो? मुळात हवामानात सतत बदल होत असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत, असे म्हटले जाते. मात्र अचानक पूर येण्यामागे केवळ हवामान बदल हेच कारण नाही.
हिमालयातील तापमान जागतिक सरासरीपेक्षा जास्त. त्यामुळे हिमनद्या वेगाने वितळत आहेत. मग त्यातून नव्या सरोवराची निर्मिती होत आहे. नेपाळच्या नद्या तेथील जलविद्युत प्रकल्पाचा आधार आहेत, परंतु त्याच नदीच्या खोऱ्यात विकासाच्या नावाखाली रस्ते, पूल, बांधकामे, पर्यटन सुविधांसाठी डोंगर फोडले जात आहेत. त्यामुळे पर्वतांचे नैसर्गिक संतुलन बिघडून मानव हे आरिष्ट ओढवून घेत आहे. तसेच चीन-तिबेटमध्ये उभारत असलेल्या महाकाय धरणांबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की, विकास करायचा की पर्यवरण जपायचे? असा प्रश्न उपस्थित होतो. तेव्हा भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक आहे. डोंगर आणि नद्या यांच्यातील समतोल राखला तरच मैदानी भागांचे भवितव्य सुरक्षित राहील.
भारताने शेजारी राष्ट्र म्हणून नेपाळला संकटाच्या काळात सर्वतोपरी मदत केली. गेल्या काही काळात विज्ञानाने प्रचंड प्रगती केली असली तरी, महापूर, भूकंप कोठे व कोणत्या वेळी होणार याबाबतचे अंदाज मिळत असले तरी अचूक अंदाज देणारे तंत्रज्ञान विकसित झालेले नाही. निसर्गाला आपण थांबवू शकत नाही. पर्वत कोसळणे, नदीला सीमा दाखवू शकत नाही, पण इशारा देऊन अशा दुर्घटना रोखण्यासाठी साधनसंपत्ती यांचा मेळ घालून नुकसान कमी करणे मानवाच्या हाती आहे. त्यासाठी नेपाळला नवीन धोरणे आखून त्यांची कटाक्षाने अंमलबजावणी करण्याकडे लक्ष द्यावे लागले. निसर्गाला आव्हान देऊन विकास साधता येत नाही. तेव्हा हिमालयाच्या भौगोलिक मर्यादा ओळखून विकास करावा लागेल. कारण नेपाळचा विनाशकारी महापूर हा प्रत्यक्षात संपूर्ण दक्षिण आशियासाठी इशारा आहे, नाहीतर भविष्यातही निसर्गाच्या अशाच विध्वंसकारी परिस्थितीचा सामना करावा लागेल.



























































