
ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी मंगळवारी पुण्यात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राशी असलेल्या आपल्या जुन्या आणि जिव्हाळ्याच्या नात्याच्या आठवणींना उजाळा दिला. बालपणीचा गणेशोत्सव, मुंबईतील चाळीतील साधं आयुष्य आणि चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीचे संघर्ष याबद्दल बोलताना जितेंद्र भावुक झाले. प्रकृती ठीक नसतानाही बाप्पाच्या दर्शनासाठी पुण्यात आल्याचे जितेंद्र यांनी सांगितले. ‘बाप्पा स्वतः मला दर्शनासाठी बोलावतात, मी स्वतःहून येत नाही.’ बाप्पाकडे काय मागितले, असे विचारले असता जितेंद्र यांनी अत्यंत भावुक उत्तर दिले. ते म्हणाले, “मृत्यू होईपर्यंत मला माझ्या पायावर चालता आले पाहिजे. हेच माझे एकमेव मागणे आहे. मृत्यू होईपर्यंत मला बाप्पाच्या दर्शनाला येत राहायचे आहे. त्यासाठी स्ट्रेचरवरून यावे लागले तरी चालेल.”
जितेंद्र यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना महाराष्ट्राशी असलेले आपले नाते किती घट्ट आहे, हे स्पष्ट केले. एका चार मजली इमारतीत त्यांचे बालपण गेले. या इमारतीत सुमारे १०० कुटुंबे राहत होती आणि त्यापैकी बहुतांश कुटुंबे महाराष्ट्रीयन व कोकणी होती. “मी तिथे एकटाच पंजाबी होतो. त्यामुळे माझ्या घरातील वातावरणही पूर्णपणे महाराष्ट्रीयन होते. माझी आईदेखील मराठी बोलायची,” असे त्यांनी सांगितले.
गणपती आणि दिवाळीच्या आठवणी सांगताना जितेंद्र यांच्या चेहऱ्यावर बालपणीचा आनंद दिसून आला. त्या काळात सणांच्या वेळी मिळणारी बुंदी ते खिशात भरून ठेवायचे आणि नंतर एकेक करून खात असत. आज मोठ्या गोष्टी मिळत असूनही बालपणीच्या त्या छोट्या आनंदाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. तब्बल १७ वर्षे त्या वातावरणात राहिल्यानंतर देवाच्या कृपेने आपण अभिनेता झालो, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल बोलताना जितेंद्र यांनी महाराष्ट्रीयन माणसांच्या स्वभावाचेही कौतुक केले. “मी पंजाबीपेक्षा जास्त महाराष्ट्रीयन आहे. माझ्या अवतीभोवती अनेक महाराष्ट्रीयन लोक राहिले. त्यांच्यासारखी चांगली माणसं मला कधीच भेटली नाहीत,” असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रीयन लोकांमध्ये अहंकार किंवा बडेजाव नसतो; मात्र स्वतःचा अभिमान आणि स्वाभिमान असतो, असेही जितेंद्र यांनी नमूद केले. त्यांचे स्वावलंबी आणि साधे जीवन आजही आपल्या मनात विशेष स्थान राखून असल्याचे त्यांनी सांगितले.




























































