कुपोषित बालकांना सशक्त करणार, जिल्हा परिषदेच्या सीईओंची घरोघरी भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघर जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी केवळ उपचार आणि पोषण आहारावर भर न देता बाल काच्या कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यावरही जिल्हा परिषदेकडून लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे घरोघरी भेटी देत असून आरोग्य व पोषणस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेत आहेत. तसेच पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांना सशक्त करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे.
मनोज रानडे यांनी अंगणवाडीतील दत्तक बेतलेल्या हार्दिक परेड याची वजन व उंची तपासून त्याच्या पोषणस्थितीची माहिती घेतली. बालकाला नियमित पोषण आहार मिळतो का? वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात आहे का? तसेच त्यांना जंतनाशक औषध देण्यात येते का? याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेण्यात येत आहे. तसेच धनश्री ठाकरे या कुपोषित बालिकेच्या घरीही भेट देऊन तिच्या आरोग्याची तसेच कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीची माहिती यावेळी घेण्यात आली.

अंडी, दूध देणार
मुलांच्या पोषणात आवश्यक सुधारणा व्हावी यासाठी त्यांना अंडी व दूध उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आरोग्याच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी दर महिन्याला भेट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील सहा महिन्यांत बालकाच्या पोषणस्थितीत लक्षणीय सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे.

आर्थिक परिस्थितीचा आढावा
कुपोषित मुलांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कुटुंबाकडे असलेली जमीन, भातशेती, पालेभाज्यांची लागवड आणि उत्पन्नाची इतर साधने याबाबत प्रशासनाने चर्चा केली. परिस्थितीनुसार महिला व बालविकास विभागासह संबंधित विभागांच्या माध्यमातून घरघंटी, शिलाई मशीन, पोल्ट्री शेड, कुक्कुटपालन आणि पशुपालन यांसारख्या योजनांचा लाभ देता येईल का, याचा आढावा घेण्यात आला.