
धान विकले… धानाची पावतीही मिळाली, मात्र त्याचे पैसे मिळाले नाहीत. पैशांअभावी आजारी आईवडिलांवर उपचार करता आले नाही आणि 15 सप्टेंबर रोजी अवघ्या एका तासाच्या अंतराने आईवडिलांचा करुण अंत झाला. काळजात कोरलेल्या या वेदनेसह भंडारा तालुक्यातील सिल्ली येथील शेतकरी प्रशांत खोब्रागडे यांनी आज जिल्हा पणन अधिकारी कार्यालय गाठले. हातात होती आईवडिलांच्या चौदावीची पत्रिका! तीच पत्रिका जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या हातात देत, ‘तुमच्यामुळे आईवडील गमावले,’ असा थेट आरोप केला.
रब्बी हंगामातील धान मे 2025 मध्ये खरेदी केंद्रावर विकले, मात्र विकलेल्या धानाचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत. पैशांअभावी आजारी आईवडिलांवर उपचार करता न आल्याने प्रशांत खोब्रागडे यांचा संताप अनावर झाला. पणन कार्यालयाच्या दिरंगाईच्या कारभाराचा निषेध व्यक्त करीत कार्यालयातच अनेक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत त्याने आईवडिलांना श्रद्धांजली वाहिली. वरवर दिसायला हे आंदोलन असले तरी, पैशांअभावी उपचाराविना आईवडील गमावलेल्या एका शेतकऱ्याच्या वेदनांचा पाढाच तिथे वाचला गेला. केंद्रावर 90 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी धान विक्री केली. मात्र, यापैकी कुणाचेही पैसे आजपर्यंत दिले गेले नाहीत.




























































