
पुण्यातील वाहनांची वाढती संख्या आणि पार्किंगच्या जागेच्या कमतरतेमुळे पुणे महापालिका प्रशासनाने सार्वजनिक वाहनतळ धोरणात मोठे बदल करण्याचे ठरवले आहे. रस्त्याबाहेरील वाहनतळावर मध्यवर्ती भागात दुचाकीसाठी आता प्रतितास 15 रुपये मोजावे लागतील. आधी केवळ एक रुपया असा दर होता. तर चारचाकीसाठी 30 रुपये दर आकारण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी आधी केवळ 7 रुपये दर होता. स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर हे नवीन दर लागू होतील.
शहरात 1 हजार ते दीड हजार नव्या वाहनांची नोंदणी होत आहे. त्यामुळे पार्किंगची समस्या भेडसावत आहे. सध्याचे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे पार्किंग शुल्क प्रति तास 1 ते 3 रुपये आणि 7 ते 14 रुपये आहे. परंतु, पुणे शहरातील शॉपिंग मॉल, विमानतळ, मल्टिप्लेक्स थिएटर, रेल्वे स्टेशन यासारख्या ठिकाणी हे शुल्क अनेक पटींनी अधिक आहे. मध्यवर्ती भागातील जागेची कमतरता लक्षात घेऊन मेकॅनिकल पार्किंग उभारण्याचाही प्रस्ताव आहे. या ठिकाण चारचाकी वाहनांसाठी प्रतितास 40 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.



























































