विजयाची रेषा एकच, मात्र विजेते दोन, जलतरणात एकाच वेळी दोघांचा टच; दोघेही ठरले सुवर्ण पदकाचे मानकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जलतरणाच्या तलावात विजय-पराजयाचा फैसला अनेकदा सेपंदाच्या शंभराव्या भागात होतो. मात्र आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दुसऱया दिवशी पुरुषांच्या 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये वेळेनेच सर्वांना चकित केले. चीनचा डोंग झिहाओ आणि यजमान जपानचा ओहाशी शिन यांनी अंतिम फेरीत अक्षरशः खांद्याला खांदा लावून पोहत अंतिम भिंतीकडे झेप घेतली. दोघांनीही एकाच क्षणी वॉल टच केला आणि इलेक्ट्रॉनिक स्कोअरबोर्डवर एकच वेळ झळकली, ती म्हणजे 58.64 सेकंद.

क्षणभर प्रेक्षकांनाही नेमका विजेता कोण, असा प्रश्न पडला. पण यावेळी फरक शोधूनही सापडला नाही. अधिकृत निकालात दोन्ही खेळाडूंची वेळ समान असल्याचे स्पष्ट झाले आणि दोघांनाही सुवर्णपदक देण्यात आले. या दोघांमुळे तिसऱया आलेल्या चिनी खेळाडूला कांस्यपदक लाभले.

जपानी प्रेक्षकांना ओहाशीच्या विजयाची तर चिनी चाहत्यांना डोंग झिहाओकडून सुवर्णाची अपेक्षा होती. शेवटी दोन्ही बाजूंच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. एका बाजूला चीनचा झेंडा, दुसऱया बाजूला जपानचा झेंडा आणि मध्ये दोन सुवर्णपदक विजेते. हे दृश्यच भन्नाट होते.