ही तर ‘छिटपुट’ घटना, जमुईतील अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीवर बिहारच्या मंत्र्यांचे असंवेदनशील वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारच्या जमुई जिल्ह्यात कोचिंग क्लासवरून मित्रासोबत घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीची काही तरुणांनी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. तसेच इतर आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना बिहारचे मंत्री श्रवण कुमार यांनी या प्रकाराला ‘छिटपुट घटना’ म्हणजेच किरकोळ असे संबोधले. अशा घटना घडत असतात, मात्र बिहारमध्ये अशा प्रकारचे कृत्य करणारे लोक कायद्यापासून वाचू शकत नाहीत, असे ते म्हणाले. अशा प्रकरणांमध्ये यापूर्वीही कठोर कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान, जनता दल युनायटेडचे बिहार प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाहा यांनीही जमुईतील प्रकाराला ‘छिटपुट’ किंवा ‘किरकोळ’ घटना असल्याचे म्हटले. अशा घटना घडल्यास प्रशासन तातडीने कारवाई करते, असा दावा त्यांनी केला.

तसेच 2005 पूर्वी बिहारमधील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती कशी होती, याची आठवण करून देताना कुशवाहा यांनी त्या काळात लोक भीतीच्या वातावरणात राहत होते आणि घराबाहेर पडण्यासही घाबरत होते, असा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळेही राजकीय वादाला तोंड फुटले आहे.