शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टरवरील हल्ला प्रकरण आरोपी साधना करांडेचा जामीन फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणातील महिला आरोपी साधना करांडे हिचा जामीन अर्ज आज कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. दरम्यान या घटनेतील मुख्य आरोपी व शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रेसह अन्य चौघांची सुनावणी २८ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. पी. वासाडे यांच्या न्यायालयात साधना करांडे हिच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश साळशिंगेकर यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाने प्रकरणाचे गांभीर्य आणि डॉक्टर व नर्स यांच्यावरील हल्ल्यांच्या गंभीर परिणामांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. दोन्ही बाजूंचा विचार केल्यानंतर न्यायालयाने साधना करांडे हिचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाण प्रकरणाची सुनावणी जलदगतीने सुरू आहे. २३ सप्टेंबर रोजी उरलेल्या साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकरणातील अन्य चार आरोपी रमेश म्हात्रे, रमेश पवार, प्रमोद निकम आणि अक्षय करांडे यांच्या जामीन अर्जाबाबतही महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे. साधना करांडे हिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर आता अन्य चार आरोपींच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.