
दिल्लीतील प्रसिद्ध कालकाजी मंदिराजवळ 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस अधिकारी असल्याचे भासवून तीन आरोपींनी मुली आणि तिच्या मैत्रिणीला धमकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार पीडित मुलगी सोमवारी (21 सप्टेंबर) सायंकाळी सुमारे 7 वाजता तिच्या 17 वर्षीय मैत्रिणीसोबत कालकाजी मंदिरात गेली होती. दर्शन घेतल्यानंतर दोघी जवळच्या एका पार्कमध्ये गेल्या. सुमारे 7.30 वाजता 25 ते 30 वयोगटातील तीन तरुण तिथे आले. त्यांनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत दोन्ही मुलींना धमकावले. त्यानंतर आरोपींनी पीडितेच्या मैत्रिणीला ओलीस ठेवले आणि त्यानंतर 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. रात्री सुमारे 8.45 वाजता पार्कमधून पोलिसांना पीसीआर कॉल मिळाला. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. चकमकीनंतर आसिफ नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्या पायाला गोळी लागली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी केली जात असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके काम करत आहेत. या प्रकरणी पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा माग काढण्यासाठी पार्क तसेच आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांकडूनही पोलिस माहिती घेत आहेत.





























































