
इंदूरच्या ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींबरोबरच्या मिमिक्रीत सहभागी झालेल्या पुलकित मणीचे दुसऱ्या दिवशीचे ‘कॉमेडियन शो’ रद्द करायला भाग पाडले गेले. हे आपल्या देशातले अभिव्यक्ती स्वातंत्र्य. राहुल गांधी सार्वजनिक मंचांवर नरेंद्र मोदी यांचे वस्त्रहरण करीत आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्वच क्षेत्रांत खड्ड्यात जात आहे व मोदी फक्त नेत्यांना घट्ट मिठ्या मारण्याचे जागतिक सोहळे करत आहेत याचे एक व्यंगचित्र सार्वजनिक मंचावर राहुल गांधी यांनी निर्माण केले. देवेंद्र फडणवीसांनी हे व्यंगचित्र म्हणजे देशाचा अपमान असल्याचे सांगितले. मोदी म्हणजे देश हे फडणवीस यांना कोणी सांगितले?
देवेंद्र फडणवीस यांचे असे मार्गदर्शन आहे की, राहुल गांधी यांनी स्टॅण्ड-अप कॉमेडियन बनावे. इंदूरमधील ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात गांधी यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी यांची नक्कल करण्यात आली. त्यामुळे भाजपवाल्यांना अस्वली गुदगुल्या झाल्या. खरे तर नव्वद टक्के भाजपवाले राहुल गांधींवर खूश आहेत. भाजपमधील एकतर्फी सांडगिरीला गांधी हे त्यांच्या विनोदाने घायाळ करीत आहेत. मालकाचे वस्त्रहरण होत असल्याने गुलाम खूश आहेत, पण मालकाची चमचेगिरी तर सोडता येत नाही. त्यामुळे ‘‘गांधी हे उत्तम कॉमेडियन आहेत’’ वगैरे शेलक्या शब्दांत ते टीका करीत आहेत. फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे राहुल गांधी यांनी स्टॅण्ड-अप कॉमेडियनचा पेशा स्वीकारला तर नरेंद्र मोदींचे काय होईल, त्यांना काय काम उरेल, ते व त्यांचे ‘जोकर्स’ अंधभक्त बेरोजगार होतील याचा विचार फडणवीस वगैरे लोकांनी केलाच असेल. मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था व परराष्ट्र धोरण मातीस मिळवले. जागतिक नेत्यांना भेटायला गेले की ते त्यांच्या गळ्यात पडून इतकी घट्ट मिठी मारतात की, त्या परदेशी नेत्यांचा जीव गुदमरून जातो. हस्तांदोलन केले तर इतका घट्ट जोरात हात दाबतात की, पाहुण्यांच्या चेहऱ्यावरील वेदना साफ दिसतात. आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराला हे शोभणारे नाही. देशात विरोधकांचे गळे दाबायचे व जागतिक मंचावर नेत्यांचा श्वास बंद होईपर्यंत घट्ट मिठ्या मारायच्या या ‘मोदी’ पॅटर्नचे प्रात्यक्षिक गांधी व त्यांचे सहकारी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात करतात तेव्हा हजारो विद्यार्थी ‘मौज’ घेतात. भारताला किती अर्धशिक्षित पंतप्रधान लाभले आहेत व त्यामुळे
जगात आपले हसे
कसे होत आहे याचे हे प्रात्यक्षिक असते. फडणवीस वगैरे लोकांना हे आवडत नाही व त्यांनी राहुल गांधी यांना कॉमेडियन म्हटले हा ‘विनोद’ या रसाचा अपमान आहे. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की हे पेशाने कॉमेडियन आहेत व मोदी त्यांना मित्र मानतात. प्रे. ट्रम्प यांनी तर ‘कॉमेडी’चे शिखर गाठले आहे. त्यांच्या माकडछाप उड्या आणि वर्तन म्हणजे हसून लोटपोट व्हावे असेच आहे. प्रे. ट्रम्प यांच्या विनोदाचे पंतप्रधान मोदी हे चाहते आहेत. प्रे. ट्रम्प यांच्या कॉमेडीचा प्रभाव मोदींवर आहे व ते त्यांच्या वागण्यात दिसते. संसदेतील त्यांचे भाषण म्हणजे ‘मिमिक्री’ किंवा कॉमेडी असते. विचित्र अंगविक्षेप, हावभाव, डोळा मिचकावणे, टाळ्या वाजवणे, अतरंगी आवाज काढणे, नेहरू व गांधींची टवाळी करणे, आपल्या वाढदिवसाला दिवे लावणे, त्यासाठी तेल पुरवठा करणे आणि वर जनतेलाच ‘तेल वाचवा’ असाही संदेश देणे, परदेश दौरे टाळा असे जनतेला सांगायचे व लगेच पाच-सहा देशांच्या दौऱ्यासाठी विमानात चढायचे, कधी रडायचे, कधी विकट हसायचे, कधी ढोल वाजवायचे, कधी नृत्य करायचे हे सर्व प्रकार ‘कॉमेडी’मध्येच मोडतात. या कॉमेडीला दाद देण्यासाठी त्यांनी अंधभक्त श्रोतृवृंद निर्माण केला आहे. मोदी यांच्या कॉमेडी शोच्या तिकीट बारीची जबाबदारी फडणवीस यांच्यावर आहे, पण सध्या या तिकीट बारीवर शुकशुकाट असून राहुल गांधी यांचे सर्व ‘शो’ हाऊसफुल्ल चालले आहेत. त्यामुळे फडणवीसांची चिडचिड समजून घेतली पाहिजे. भारतात गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या मारणाऱ्यांना संरक्षण आहे, पण पंतप्रधानांवर टीका करण्याचे
स्वातंत्र्य नाही हे अजब
आहे. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री संपूर्ण संसद सत्रात सभागृहात फिरकत नाहीत ही लोकशाहीची ‘मिमिक्री’ आहे असे फडणवीस यांच्यासारख्यांना वाटत नाही, पण राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर विनोदी पद्धतीने भाष्य काय केले, सगळ्यांच्याच बुडाला मिरच्या झोंबल्या. आज पंतप्रधान मोदींची नक्कल केली म्हणून भाजपवाले थयथयाट करीत आहेत, पण डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना याच मंडळींनी त्यांची काय कमी टिंगलटवाळी केली होती? ‘मौनीबाबा’, ‘धोरण लकवा’ यांसारखी विशेषणे लावून त्यांची हेटाळणी करणारी हीच मंडळी होती. तेव्हा तो डॉ. मनमोहन सिंग आणि पंतप्रधानपदाचा अपमान नव्हता का? पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच राहुल गांधी यांना ‘असंस्कारी नाराज फुफा’ असे संबोधले तेव्हा विरोधी पक्षनेत्यांचा अपमानच झाला, पण तुमच्या विदूषकगिरीला लोकांनी डोक्यावर घ्यायचे व दुसऱ्याने थोडा विनोद केला की, त्यास मूर्ख ठरवायचे. आता यांचे पुढचे उद्योग पहा. इंदूरच्या ‘छात्रों की गूंज’मध्ये राहुल गांधींबरोबरच्या मिमिक्रीत सहभागी झालेल्या पुलकित मणीचे दुसऱ्या दिवशीचे ‘कॉमेडियन शो’ रद्द करायला भाग पाडले गेले. हे आपल्या देशातले अभिव्यक्ती स्वातंत्र्य. राहुल गांधी सार्वजनिक मंचांवर नरेंद्र मोदी यांचे वस्त्रहरण करीत आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्वच क्षेत्रांत खड्ड्यात जात आहे व मोदी फक्त नेत्यांना घट्ट मिठ्या मारण्याचे जागतिक सोहळे करत आहेत याचे एक व्यंगचित्र सार्वजनिक मंचावर राहुल गांधी यांनी निर्माण केले. देवेंद्र फडणवीसांनी हे व्यंगचित्र म्हणजे देशाचा अपमान असल्याचे सांगितले. मोदी म्हणजे देश हे फडणवीस यांना कोणी सांगितले?































































