रोखठोक – वरना ‘गालिब’ की आबरू क्या है?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे आमदार पराग शहा हे एक दिवस भिकाऱ्याच्या वेषात फिरले. गरीबाचे जगणे समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पंतप्रधान मोदीही ‘फकीर’ असल्याचा दावा करतात. प्रत्यक्षात या सगळ्यांचे जगणे श्रीमंती थाटाचे आहे. समाजात गरीबाला विचारतंय कोण? देखाव्यांना महत्त्व आहे.

महाराष्ट्र विधानसभेतील एक धनाढ्य आमदार पराग शहा हे भिकाऱ्याच्या वेषात स्वतःच्या मतदारसंघात एक दिवस फिरले याची चर्चा सर्वत्र झाली. जैन धर्मीय शहा यांना त्यांच्या गुरूंनी आदेश दिला, ‘जनतेची दुःखं काय आहेत ते एकदा वेष पालटून फिरा व समजून घ्या. तुम्ही सत्तेवर आहात, श्रीमंत आहात म्हणून लोक तुम्हाला ओळखतात, मानसन्मान देतात. तुम्ही एक दिवस भिकाऱ्याच्या वेषात फिरा, म्हणजे तुमचा हा अहंकार गळून पडेल.’ आमदार पराग शहा यांनी गुरूंचा आदेश पाळला व ते एक दिवस भिकाऱ्याचे जीवन जगून पुन्हा नेहमीच्या स्वर्गीय जीवनशैलीत परतले. मात्र काही तास त्यांनी भिकाऱ्याचे जीवन जगण्याचा प्रयत्न केला व समाजात खरे दुःख काय आहे ते अनुभवले. पराग शहा यांची संपत्ती पाच हजार कोटींची आहे. विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शहा यांनी 3,383 कोटींची अधिकृत संपत्ती जाहीर केली. त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना काहीच कमी नाही. सर्व सुखे दारात हात जोडून उभी आहेत. तरीही जैन मुनींच्या आदेशाने एक दिवसाचे भिकाऱ्याचे आयुष्य ते जगले. अर्थात पराग शहा एक दिवसासाठी भिकारी झाले म्हणून भारतातील भिकाऱ्यांच्या जीवनात काही फरक पडणार आहे काय? हा चिंतनाचा विषय आहे.

श्रीमंतांचे उद्योग

भिकारी होऊन एखाद् दिवस जगण्याचा प्रयत्न अनेक श्रीमंतांनी केला आहे. भगवान बुद्ध किंवा भगवान महावीर हे तर संपन्न राज्य सोडून भिकारी झाले. ज्याने श्रीमंतीचा रस चाखला, वैभव भोगले आणि मग ते कायमचे सोडले त्याच्या भिकारीपणाला त्यागाची झळाळी असते. जन्मजात भिकारी आणि राज्याचा त्याग करून जगणारा भिकारी यात मोठे अंतर आहे. राजे, महाराजे, मंत्री, मुख्यमंत्री, धनिकांच्या दरबारात भिकाऱ्यांना प्रवेश मिळत नाही. मग तो भिकारी कितीही हुशार, विद्वान असो. याचा अनुभव मिर्झा गालिबने घेतला आहे. बादशहा बहादूर शाह जफर हा ‘मेजवान्या’ देणारा सम्राट होता. त्याचा दरबार हा मसलतींपेक्षा मेजवान्यांसाठी प्रसिद्ध होता. एका मेजवानीचे निमंत्रण बादशहाने गालिबला पाठवले. गालिब गरीबच होता. त्याच्या अंगावर सदैव जुने कपडे, तेही ठिगळ लावलेले. चपलाही फाटक्या. टोपी तर रंग उडालेली, कुबट घामट वास येणारी. बादशहाचे निमंत्रण मिळताच गालिब सुखावला. ही आनंदवार्ता त्याने मित्रांना कळवली. मित्र म्हणाले, “गालिब, दरबारी मेजवानीला जाण्याचा मूर्खपणा करू नकोस. तुझा अपमान होईल. तुझे कपडे, चपला पाहून राजवाड्याचा दरबान तुला हाकलून देईल…”

“मी कवी आहे…” गालिब म्हणाला.

“अरे बाबा, कसला कवी आणि कसला लेखक! इथे कवी आणि कवितेला ओळखणारी नजर नाही. फक्त कपड्यांवरून ओळख पटवतात.’’ मित्रांनी समजूत घातली.

गालिबचा हट्ट कायम होता, “त्याने मला कवी म्हणून बोलावले आहे. माझे कपडे चांगले नाहीत म्हणून काय झाले? मी जातोच…” आणि गालिब त्याच्या त्या जीर्ण, फाटक्या कपड्यांतच मेजवानीला गेला.

अनेक राव-उमराव मेजवानीसाठी येत होते. दरवाजावरचे ‘दरबान’ सगळ्यांना झुकून सलाम करत होते. गालिब आत जाऊ लागला तेव्हा त्याला ओढून बाजूला फेकले. “ए भिकारड्या, राजवाडा आहे हा! आत कसा शिरतोस?” गालिब म्हणाला, “मी का घुसेन? मी आजच्या मेजवानीला निमंत्रित आहे. हे पहा माझे निमंत्रण…” आणि त्याने खिशातून निमंत्रण काढून दाखवले. दरबान चेष्टेने हसला व म्हणाला, “बादशहा भिकाऱ्यांना निमंत्रण देत नाहीत. हे निमंत्रण तू कुणाचे तरी चोरले आहेस. इथून निघ, नाहीतर निमंत्रण चोरले म्हणून तुरुंगात पाठवीन. भिकारी स्वतःला कधीपासून बादशहा समजायला लागला?”

गालिब दुःखी मनाने परत आला. तोपर्यंत मित्रांनी ‘उधारी’वर आणलेले चांगले कपडे, कोट, चपला, छत्री, अत्तर वगैरे तयार ठेवले होते. ते घालून गालिब पुन्हा दरबारात पोहोचला. तोच दरबान झुकून म्हणाला, “यावे यावे, हुजूर यावे. आम्ही तुमचे स्वागत करतो.” गालिबचे निमंत्रणही त्याने तपासले नाही. गालिबला बादशहाच्या जवळच नेऊन बसवले. जेवण सुरू झाले. मद्यही होते. गालिबने एक विचित्र प्रकार सुरू केला. तो ताटातून घास उचलायचा. कबाब, रोटी, बिर्याणी वगैरे आणि आपल्या नक्षीदार कोटाला घास भरवून बोलू लागला, “खा खा… माझ्या सुंदर कोटा खा… खा… माझ्या सुंदर चपलांनो खा…खरे तर बादशहाच्या मेजवानीसाठी तुम्ही आला आहात, मी नाही.”

बादशहाने हा प्रकार पाहिला. त्याला आश्चर्य वाटले. “गालिब तुम्ही हे काय करीत आहात?” गालिब म्हणाला, “बादशहा हुजूर, पहिल्यांदा मी आलो तेव्हा मला भिकारी समजून बाहेर फेकले. आत सोडले नाही. दुसऱ्यांदा माझ्या अंगावर हे कपडे, टोपी आली तेव्हा सलाम, सन्मान झाला. म्हणून जेवण आणि सन्मान या कपड्यांना, देखाव्याला द्यायला हवे. मी आलो तेव्हा मला हाकलले. माझे कपडे आले तेव्हा आत सोडले.”

पराग शहांच्या कथेतही गालिब आहे. जग माणसाला ओळखत नाही. कपडे, पद, पैशाला ओळखते. पराग शहांना त्या दिवशी कोणीच ओळखले नाही. त्याच्या इमारतीच्या पहारेकऱ्यानेही त्यांना आत सोडले नाही. एकंदरीत त्यांचा मेकअप चांगला होता.

असाही फकीर…

पंतप्रधान मोदी म्हणतात, “मी फकीर आहे.” पण ते फकिराचे जीवन जगत नाहीत. 85 कोटी लोकांना ते दहा किलो फुकट धान्य देतात व स्वतः दहा लाखांचे कपडे घालून मिरवतात. त्यांच्या बँक खात्यावर दहा हजार कोटी आहेत (खासगी पीएम केअर फंड) मोदींना अहंकार आहे. हा अहंकार फकिरीचा, श्रीमंतीचा की सत्तेचा, हे त्यांनाही कळत नसावे. मोदी यांच्या राजकारणाने देशात विद्वेषाचे विष कसे भिनले आहे, ते एकदा त्यांनी वेष पालटून पाहायला हवे. प्रजेत वेष पालटून फिरणारा राजा हा गरीबांचा कैवारी असतो. 16 व्या शतकात स्काटलंडचा राजा जेम्स (पाचवा) जो ‘गुडमॅन ऑफ बालेंगेइच’ या नावाने एक सामान्य माणूस म्हणून अनेकदा भिकारी बनून आपल्या प्रजेत फिरत असे. लोकांचे प्रश्न काय आहेत, लोकांचे दुःख काय आहे हे समजून घेण्यासाठी तो फिरत असे. त्याला ‘गरीबांचा राजा’ (पुअर मॅन्स किंग) म्हणूनही संबोधले जात असे. खलिफा हारून अल रशीद बगदादच्या रस्त्यांवर सामान्य माणूस किंवा व्यापारी बनून फिरत असे. कधी तो रस्त्यावरील भिकाऱ्यांच्या समूहात भिकारी बनून झोपत असे. राजा हरिश्चंद्राने त्याचे सवा राज्य दान दिले व भिकाऱ्यासारखा जगला. सिनेसृष्टीतल्या व इतर उद्योगांतल्या अनेक दिग्गजांचा ‘रावांचा रंक’ झाला. आलिशान बंगले, गाड्याघोडे नष्ट होऊन ते एखाद्या चाळीत किंवा झोपडीत जगण्यास मजबूर झाले. अशी अनेक उदाहरणे आपल्या सभोवती घडत असतात. अनेक जण मुंबईच्या फुटपाथवर भिकाऱ्यासारखे जगले व पुढे त्यांनी श्रीमंतीची शिखरे गाठली. बुद्ध, महावीरांनी ‘सर्वस्व’ सोडले. ते पुन्हा त्या मायानगरीत गेले नाहीत. एक ज्ञानी राजा सदैव प्रजेचा विचार करी, पण आपल्यानंतर ‘राजकुमार’ हा असा विचार करील काय? ही त्याला चिंता वाटत असे. एक दिवस त्याने राजकुमाराला सांगितले, “प्रजेत जा. शक्यतो या आपल्या राज्याबाहेर जाऊन भीक माग. तू या राज्याचा राजकुमार आहेस हे विसर.” मुलगा ऐकतो. तो खरोखरच भिकारी म्हणून जगायला सुरुवात करतो. एक दिवस राजा त्याला परत बोलावतो आणि सांगतो, “आधी तू राजकुमार होतास, आता भिकारी बनलास. या दोन्ही दुसऱ्यांनी दिलेल्या ओळखी आहेत. या दोन टोकांमध्येच सर्व जग अधांतरी लटकत आहे. तू या दोन्ही ओळखींच्या पलीकडे जाशील, तसे तुला खात्रीने वाटेल तेव्हाच तुझा अहंकार संपेल. तुला खरी ज्ञानप्राप्ती होईल.” काही तासांसाठी वेषांतर करून भिकारी होणे हा एक छोटासा पर्याय आहे. पण तो त्याग नाही. त्याग म्हणजे फक्त कपडे बदलणे नाही. बुद्ध, महावीरांप्रमाणे स्वतःची ओळख पुसणे हाच त्याग.

गालिबचा एक ‘शेर’ सांगतो आणि हा विषय संपवतो. गालिब म्हणतो,

“हुआ हैं शह का मुसाहिब,
फिरे हैं इतराता..
वरना शहर में ‘गालिब’ की
आबरू क्या है…

बादशहाची कृपादृष्टी आहे, बादशहा ओळख दाखवतो म्हणून तो जरा ऐटीतच फिरतो. नाहीतर या शहरात गालिबची इज्जत ती काय आहे?

Twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]