
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंध असल्याचा एक जरी पुरावा आरोप करणाऱ्यांकडे असेल तर दाखवावा, असे आव्हान शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी आज दिले. आदित्य ठाकरे यांची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचा प्रत्यारोप त्यांनी केला.
दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांचे सर्व आरोप वरुण सरदेसाई यांनी फेटाळून लावले. आदित्य ठाकरे सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांना ओळखतही नव्हते. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठीच सतीश सालियन यांच्याकडून आरोप सुरू आहेत, असे सरदेसाई म्हणाले. या प्रकरणाचा तपास यापूर्वीही झाला होता. पोलिसांनी पाच वेळा दिशाच्या वडिलांना नोटीस देऊन जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. पण ते आले नव्हते, कोर्टामध्ये 18 पानांचे प्रतिज्ञापत्र सरकारने सादर केले आहे. त्यातही आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे यांना बदनाम करणे थांबवा आणि सीबीआय चौकशी होऊ द्या, त्यातून खरे काय ते पुढे येईल, असे त्यांनी म्हटले आहे.




























































