यूपीआयवरील शुल्क हा देशवासीयांसाठी सापळा; राज ठाकरे यांचा मोदी सरकारवर हल्ला, विरोध करण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन हजार रुपयांपेक्षा अधिकच्या यूपीआय व्यवहारावर एमडीआर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. हा देशवासीयांसाठी डिजिटल सापळा आहे. त्यात प्रत्येक भारतीय आता अडकला आहे. हे शुल्क भरण्यास व्यापाऱयांनी विरोध करावा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

राज ठाकरे यांनी ‘दारावरची टकटक’ या शीर्षकासह सविस्तर फेसबुक पोस्ट केली आहे. आधी नोटाबंदी करून आम्ही कसे डिजिटल व्यवहाराला चालना देतोय हे दाखवत यूपीआय व्यवस्था आणली. स्वतःची स्तुती करून घेतली, लोकांना सवय लावली आणि आता या व्यवहारांवर शुल्क लावले अशी नाराजी राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

सरकारचे म्हणणे आहे की हा भार व्यापाऱयांनी सोसायचा, काय खात्री आहे की व्यापारी हा भार सोसतील आणि ग्राहकांच्या माथी तो मारणार नाहीत? यासाठी काही यंत्रणा सरकारकडे आहे का? उत्तर आहे अजिबात ‘नाही’, असे फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.

श्वासोच्छ्वासावर जीएसटी लावता येत नाही म्हणून

सध्याच्या अर्थमंत्री बाईंना श्वासोच्छ्वासावर जीएसटी लावणे शक्य नाही म्हणून त्यांनी एमडीआरवर जीएसटी लावला आहे. थोडक्यात जमेल तिथून नागरिकांच्या खिशात हात घालत आहेत. पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन यूपीआयची जाहिरातबाजी करायचे आणि स्वतःची पाठ थोपटवून घ्यायचे, ते आता परत जेव्हा परदेशात जातील तेव्हा मी कसा एमडीआर आणि जीएसटी लावला हे पण हसून हसून सांगणार का, असा सवाल त्यांनी केला.