सर्पदंशामुळे 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू; उपचारात हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबीयांचा आरोप, धर्माबाद ग्रामीण रुग्णालयात तणाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विषारी सापाच्या दंशामुळे 17 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान निझामाबाद येथे दुर्दैवी मृत्यू झाला. सय्यद रिहान सय्यद खाजा (वय – 17, रा. बाळापूर, धर्माबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर उपचारात हलगर्जीपणा आणि अँटी-वेनम मिळण्यास विलंब झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला असून शनिवारी रात्री धर्माबाद ग्रामीण रुग्णालय परिसरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद रिहान हा गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी पलंगावर विश्रांती घेत असताना त्याला एका विषारी सापाने दंश केला. घटनेचे गांभीर्य ओळखून कुटुंबीयांनी त्याला तातडीने धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची बिघडती प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारासाठी तेलंगणातील निझामाबाद येथे हलवण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू असतानाच शनिवारी (19 सप्टेंबर) त्याचा मृत्यू झाला.

रुग्णालयात सर्व सुविधा आणि रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही गंभीर रुग्णाला पुढील उपचारासाठी खासगी वाहनातून का पाठवण्यात आले? असा सवाल उपस्थित करत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रुग्णवाहिकेचा वापर वेळेवर झाला असता, तर कदाचित रिहानचे प्राण वाचले असते, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

रुग्णालय परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव

तरुणाच्या मृत्यूची बातमी शहरात पसरताच संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रुग्णालय परिसरात मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत गर्दी पांगवली. पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनुचित प्रकार टाळण्यासाठी रुग्णालयात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

डॉक्टरांचे स्पष्टीकरण

रुग्णाला रुग्णालयात आणताच तातडीने ‘अँटी-वेनम’चे (विषरोधी) इंजेक्शन देण्यात आले होते. मात्र, सापाचे विष अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्याने ते शरीरात वेगाने पसरले. डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले; परंतु विषाच्या तीव्रतेमुळे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असे धर्माबाद ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमर म्हणाले. तर दुसरीकडे मृत तरुणाच्या मृतदेहाचे रविवारी निझामाबाद येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.