
डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानी नागरिकांना मोठा दणका दिला आहे. ट्रम्प यांनी एच-1बी व्हिसावर 1 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 83 लाख रुपये शुल्क आकारण्याच्या निर्णयाला वर्षभराची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता एच-1बी व्हिसासाठी 21 सप्टेंबर 2027 पर्यंत 83 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. या वादग्रस्त स्थलांतर नियमाविरोधात अमेरिकेच्या न्यायालयांमध्ये कायदेशीर आव्हाने सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रम्प यांनी हे प्रस्तावित शुल्क लागू करणाऱ्या मूळ कार्यकारी आदेशाला मुदतवाढ दिली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये पहिल्यांदा जारी करण्यात आलेला हा आदेश या महिन्यात कालबाह्य होणार होता. एच-1बी प्रोग्रामद्वारे अमेरिकन कंपन्यांना परदेशी कुशल कामगारांना काही वर्षांसाठी नोकरीवर ठेवण्याची परवानगी मिळते.
अमेरिकेला फायदा
आयटी स्टाफिंग आणि आऊटसोर्सिंग कंपन्यांनी त्यांची एकत्रित एच-1बी नोंदणी 24 हजार 946 वरून थेट 2 हजार 055 पर्यंत कमी केली आहे. आर्थिक वर्ष 2025 आणि 2027 च्या कॅप सीझन दरम्यान कॉन्स्युलर-प्रोसेसिंग विनंत्यांमध्ये जवळपास 97 टक्के घट झाली आहे. अमेरिकन मास्टर डिग्री असलेल्या आर्थिक वर्ष 2027 च्या नोंदणीकृत उमेदवारांचा वाटा आर्थिक वर्ष 2026 मधील 45.1 टक्के वरून वाढून 66.1 टक्के झाला आहे.































































