
पुनर्विकासासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात अपयश आल्याने ठाणे भारत सहकारी बँकेने शिवाजी पार्क येथील सीकेपी हॉल लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. समाजाचा मानबिंदू असलेल्या वास्तूचा लिलाव करण्याची वेळ आल्याने सीकेपी समाजात अस्वस्थता पसरली असून लिलावापासून ही वास्तू वाचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सीकेपी हॉलच्या व्यवस्थापन समितीने सभागृहाच्या पुनर्विकासासाठी ठाणे भारत सहकारी बँकेकडून सुमारे साडेआठ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जातून सीकेपी हॉलची पाच मजली अर्धवट इमारत उभी राहिली. पुढे कर्जाची परतफेड करण्यात अडचणी निर्माण झाल्या. कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने मालमत्ता लिलावात काढण्याची नोटीस जारी केली आहे.
ठाणे भारत सहकारी बँकेचे साडेआठ कोटी रुपयांचे कर्ज आणि मुंबई महापालिकेची अंदाजे तीन कोटी रुपयांची थकबाकी, अशी एकूण सुमारे 12 ते 13 कोटी रुपयांची देणी भागविण्यासाठी सुमारे 35 कोटी रुपयांची मालमत्ता विक्रीला काढण्याची वेळ आल्याने सीकेपी समाजात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शिवाजी पार्कसारख्या मध्यवर्ती भागातील समाजाची वास्तू अशा प्रकारे विक्रीला जाणे हा समाजासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. जागेचे महत्त्व लक्षात घेता कोणताही व्यावसायिक किंवा संस्था 35 ते 36 कोटी रुपयांना जागा सहजपणे विकत घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भावनिक नाते
सीकेपी हॉलच्या वास्तूशी अनेकांचे भावनिक नाते आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 12 ऑक्टोबर रोजी होऊ घातलेला लिलाव टाळण्यासाठी सीकेपी समाजातील मंडळींनी एकत्र येऊन मार्ग काढण्याचे आवाहन अॅड. शिरीष वा. देशपांडे यांनी केले आहे.





























































