केरळम नौदल अकादमीतून बांगलादेशीला अटक, वर्षभरापासून कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळममधील एझिमाला नौदल अकादमीत बनावट कागदपत्रांच्या आधारावर हिंदुस्थानी नागरिक असल्याचे दाखवून लाँड्रीत काम करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. बिप्लब सोरेन असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो अकादमीच्या लॉण्ड्री विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता.

नौदल अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करत त्याच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तो वैध कागदपत्रांशिवाय हिंदुस्थानात राहत होता. बिप्लबच्या वर्तनावर संशय आल्याने नौदल अधिकाऱ्यांनी त्याच्यावर नजर ठेवली. तपासादरम्यान त्याच्या मोबाईल फोनमधून अशी कागदपत्रे आणि माहिती मिळाली, ज्यावरून तो बांगलादेशी नागरिक असल्याचे संकेत मिळाले. बिप्लब सोरेन एक वर्षापासून संवेदनशील संरक्षण संस्थेत कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. त्याचे राष्ट्रीयत्व समजू न शकल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. तपास यंत्रणा आता बिप्लबने बनावट कागदपत्रे कशी मिळवली आणि संवेदनशील संरक्षण संस्थेत प्रवेश कसा मिळवला, याचा शोध घेत आहेत.