
आयुष्यात जर पहिल्यांदाच परदेश प्रवासाचे नियोजन करत असाल तर, मनात प्रचंड उत्सुकतेसोबतच थोडी धाकधूक असणे स्वाभाविक आहे. योग्य नियोजनावेळी पहिल्याच आंतरराष्ट्रीय प्रवासात अनेकदा गोंधळ उडू शकतो किंवा विनाकारण जास्त खर्च होऊ शकतो. म्हणूनच, पहिल्या परदेशवारीसाठी जाण्याचे योग्य ठिकाण निवडताना आणि प्रवास नियेोजन करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमची ही पहिली परदेशवारी आनंददायी आणि टेन्शन-फ्री व्हावी, यासाठी काही सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रॅव्हल टिप्स खालीलप्रमाणे, जाणून घ्या….
व्हिसा प्रक्रियेची माहिती घ्या
आंतरराष्ट्रीय प्रवासात व्हिसा हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. काही देश हिंदुस्तानिंना व्हिसाशिवाय प्रवेश देतात, तर काही देश व्हिसा-ऑन-अरायव्हल किंवा इतर प्रकारचे व्हिसा देतात. तथापि, काही देशांमध्ये व्हिसा मिळवणे अधिक कठीण असते आणि त्यासाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे अशा देशांची निवड करा (उदा. थायलंड, व्हिएतनाम, मलेशियन किंवा अमिराती देश). यामुळे कागदपत्रांचा खटला आणि व्हिसा नाकारला जाण्याची भीती कमी होण्यास मदत होत.
बजेट आणि चलनाचे मूल्य
परदेशवारीचा निर्णय घेण्यापूर्वी त्या देशाचे चलन आणि तिथला दैनंदिन खर्च यांचा योग्य तो अंदाज घ्या. हिंदुस्थानी रुपयाच्या तुलनेत ज्या देशाचे चलन स्वस्त किंवा जवळपास समान असेल तिथे तुमचा राहण्याचा, खाण्याचा आणि फिरण्याचा खर्च बजेटमध्ये बसतो. तसेच फ्लाइट तिकिटे, हॉटेल बुकिंग, खाद्यपदार्थ आणि स्थानिक वाहतूक या सर्वांचा आधीच अंदाज बांधून बजेट ठरवा.
भाषेची सोय आणि सुरक्षितता
पहिल्या प्रवासात अशा देशाची निवड करा जिथे भाषेचा मोठा अडथळा येणार नाही. ज्या ठिकाणी इंग्रजी भाषा सहजरीत्या समजली आणि बोलली जाते, तिथे फिरणे, स्थानिकांशी संवाद साधणे आणि मदत मिळवणे सोपे जाते. याशिवाय, पर्यटकांसाठी तो देश किती सुरक्षित आहे हे देखील तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रवासाचा कालावधी आणि अंतर
पहिल्याच ट्रिपसाठी खूप लांबचा आणि अनेक फ्लाइट्स बदलावा लागणारा प्रवास टाळावा. सुरुवातीला हिंदुस्थानपासून जवळ असणाऱ्या आणि थेट फ्लाइट्स उपलब्ध असलेल्या देशांना प्राधान्य द्या. यामुळे प्रवासाचा थकवा कमी होतो. तुम्हाला तुमच्या सुट्टीचा बहुतेक वेळ प्रवासात घालवायचा नसेल. त्यामुळे, सहज पोहोचता येतील अशा ठिकाणांचा विचार करा. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की तुमची पहिला प्रवास तणावपूर्ण असू शकते. तुम्ही जितके जास्त दिवस राहाल, तितका तुमचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे राहण्याचा आणि जेवणाचा खर्च वाढेल.
हवामान आणि प्रवासाची योग्य वेळ
तुम्ही ज्या देशात जाणार आहात, तिथले सध्याचे हवामान कसे आहे हे नक्की तपासा. खूप जास्त थंड किंवा अत्यंत उष्ण हवामान असलेल्या ठिकाणी पहिल्यांदा जाणे त्रासदायक ठरू शकते. तसेच, ऐन पावसाळ्यात किंवा वादळाच्या मोसमात प्रवास करणे टाळा.
- पहिल्या परदेशवारीला निघण्यापूर्वी पासपोर्टची वैधता तपासून घ्या, ट्रॅव्हल इन्शुरन्स, आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे आणि स्थानिक आपत्कालीन नंबर आधीच फोन मध्ये सेव्ह करून ठेवा. जेणेकरुन तुमच्या प्रवासात कुठलाही अडथळा येणार नाही आणि तुमचा प्रवास सुखकर आणि आनंदायी होईल.




























































