प्रौढ व्यक्तीला धर्म अन् जोडीदार निवडण्याचा अधिकार, अलाहाबाद हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोणत्याही प्रौढ व्यक्तीला स्वतःचा धर्म आणि जोडीदार निवडण्याचा घटनात्मक अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा अलाहाबाद हायकोर्टाने दिला. मुलाचे ब्रेनवॉश केल्याचा दावासुद्धा कोर्टाने या वेळी फेटाळला. प्रौढ व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर निर्बंध घालता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती संदीप जैन यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

आयुषला त्याचे वडील देवराज सिंह मलिक यांनी राज्य सरकारच्या संगनमताने बेकायदेशीररीत्या घरात डांबून ठेवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आयुषने इस्लाम स्वीकारला असून चांदनी कुरेशी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुषच्या वडिलांनी चांदनी आणि तिच्या वडिलांविरोधात जूनमध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींचाही समावेश होता. या प्रकरणात दोघांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. न्यायाधीशांशी झालेल्या संवादात आयुषने आपले वय 31 वर्षे असून बी. फार्मपर्यंत शिक्षण झाल्याचे सांगितले. त्याने 2014 मध्ये स्वतःच्या इच्छेने इस्लाम स्वीकारला आणि हा निर्णय घेताना कोणत्याही प्रकारचा दबाव, धमकी, जबरदस्ती किंवा आमिष दाखवण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले. चांदनीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चांदनी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ब्रेनवॉश केल्याचा वडिलांचा दावा

काही व्यक्तींनी आयुषवर प्रभाव टाकला असून त्याचे ‘ब्रेनवॉश’ करण्यात आले आहे. त्यामुळे त्याने स्वेच्छेने इस्लाम स्वीकारलेला नाही, असा दावा वडिलांनी केला. मुलाच्या भविष्याबाबत चिंता असल्याचे सांगत त्यांनी आयुषच्या इस्लाम स्वीकारण्याच्या आणि चांदनीशी लग्न करण्याच्या निर्णयाला विरोध केला. मात्र आयुषने वडिलांचे सर्व दावे फेटाळले. आपले निर्णय स्वेच्छेने, स्वतंत्रपणे, विचारपूर्वक घेतल्याचे त्याने सांगितले.