
देश-विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसाद तयार करण्यासाठी शुद्ध तुपाऐवजी पाम तेलाचा वापर होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करत सुकृती फूड्सचे प्रमोटर कैलास चंद मंगला यांना अटक केली आहे. ईडीच्या हैदराबाद विभागाने मनी लॉण्डरिंग प्रकरणी ही कारवाई केली असून न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
तिरुपती तिरुपती देवस्थानमला अॅगमार्क स्पेशल ग्रेड गायीचे तूप म्हणून पुरवठा केला जात होता. मात्र, प्रत्यक्ष तपासात हे तूप रिफाइंड पाम तेल, पाम कर्नल तेल, पालमोलीन आणि विविध रसायनांच्या मिश्रणातून तयार केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये MG-90, मोनोग्लिसराइड्स, मायव्हासेट सॉफ्ट 400आणि ॲसिटिक ॲसिड एस्टर या घातक घटकांचा समावेश होता.
तपास यंत्रणेनुसार 2019 ते 2024 या काळात तिरुपती देवस्थानला सुमारे 230 कोटी रुपयांच्या बनावट तुपाचा पुरवठा झाला आहे. यातील एकट्या कैलास मंगला याने आपल्या कारखान्यात 96 कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप बनवल्याचा आरोप आहे. मंगला याने भेसळीचे साहित्य मिळवून देऊन स्वतःच्या कारखान्यात हे बनावट तूप तयार केले.
कैलास मंगला याने हे भेसळयुक्त तूप थेट न पाठवता विविध शेल कंपन्यांच्याआडून देवस्थानला पोहोचवले. यामध्ये ‘श्री वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज’, ‘मलगंगा मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स’ आणि ‘ए.आर. डेअरी फूड्स’ या कंपन्यांचा समावेश होता. एवढेच नाही तर रिफाइंड पाम तेल आणि तुपाच्या खरेदी-विक्रीची खरी माहिती लपवण्यासाठी मंगला याने खोट्या नोंदी आणि बनावट कागदपत्रे तयार केली होती. बनावट तूप हे अस्सल गायीचेच तूप आहे असा आभास निर्माण करण्यासाठी त्याने हा बनाव रचला होता.
दरम्यान, यापूर्वी ईडीने याच प्रकरणात ‘भोले बाबा ऑरगॅनिक डेअरी मिल्क’चा प्रमोटर आणि संचालक विपिन जैन याला अटक केली होती. आता मंगलाच्या अटकेमुळे या आंतरराज्यीय भेसळ रॅकेटचा पर्दाफाश झाला असून ईडी या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.




























































