
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. आता निकषांची आणि 5 ऑक्टोबरच्या औपचारिकतेची वाट पाहत बसू नका, राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱयांना हेक्टरी 50 हजार रुपये तर शेतमजुरांना 25 हजार रुपयांची मदत द्या, असेही त्यांनी नमूद केले आहे.
पावसाच्या खंडामुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद ही सर्वच खरीप पिके वाळून करपून गेली आहेत. इतर पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱयाचा उत्पादन खर्चही निघणे अशक्य झाले आहे. पिण्याचे पाणी आणि पशुधनाच्या चाऱयाचा प्रश्नही गंभीर झाला असून ग्रामीण जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती आहे, असे विदारक वास्तव शरद पवार यांनी मांडले आहे. मुख्यमंत्री राजकारण बाजूला ठेवून सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतील आणि अंमलबजावणीचे आदेश जारी करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
पत्रामधील 9 मागण्या
- बाधित तालुक्यांना दुष्काळसदृश घोषित करून सर्व दुष्काळी सवलती तत्काळ लागू करा.
- शेतकऱयांना हेक्टरी 50 हजार, शेतमजुरांना 25 हजारांची मदत द्या.
- कर्जमाफी व 1 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्या.
- पीकविमा योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा.
- रोहयोतून विशेष कामे व फळबागांसाठी टँकर पुरवा.
- मागणीनुसार चारा छावण्या व पिण्याचे टँकर पुरवा.
- लोडशेडिंग बंद करा, रोहित्र दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबवा.
- राज्य व जिल्हा पातळीवर 24 तास नियंत्रण कक्ष सुरू करा.
- विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करा.



























































