
अकरा वर्षांपूर्वी ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाला हिंदुस्थानची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवडले गेले होते. त्यानंतर आता ‘गोंधळ’च्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि मराठी चित्रपटसृष्टीला ऑस्करच्या व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा, भावनिक आणि ऐतिहासिक आहे.
‘डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर -१, ‘धुरंधर -२ ’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘देऊळबंद २’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ यांसारखे विविध भाषांतील अनेक दर्जेदार आणि चर्चित चित्रपट अधिकृत ऑस्कर प्रवेशाच्या शर्यतीत होते. काही चित्रपटांना आंतरराष्ट्रीय महोत्सवांची पार्श्वभूमी होती, तर काही चित्रपटांमागे भव्य निर्मितीमूल्य, मोठे कलाकार आणि प्रचंड व्यावसायिक ताकद होती. या विविध आणि तगड्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या जिवंत सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी सिनेमॅटिक दर्शन घडवणाऱ्या मराठी ‘गोंधळ’ची निवड झाली आणि देशाचे अधिकृत ऑस्कर प्रतिनिधित्व करण्याचा ऐतिहासिक मान चित्रपटाला मिळाला.
‘गोंधळ’चा मूळ गाभा हिंदुस्थानी मातीतला असला, तरी चित्रपटाची सिनेमॅटिक भाषा, तांत्रिक गुणवत्ता आणि निर्मितीमूल्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. त्यामुळे जागतिक स्पर्धेत हा चित्रपट प्रभावीपणे उभा राहू शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. आमच्या चित्रपटावर विश्वास दाखवल्याबद्दल केंद्र सरकार, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि एफएफआयच्या निवड समितीतील सर्व मान्यवर ज्युरी सदस्यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. अनेक मोठ्या आणि दर्जेदार चित्रपटांमधून ज्युरीने ‘गोंधळ’ची निवड केली, ही आमच्यासाठी सन्मानासोबतच एक मोठी राष्ट्रीय जबाबदारी आहे. हा केवळ एका चित्रपटाचा गौरव नाही, भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची जिवंत लोकपरंपरा आणि आपल्या मातीतून जन्मलेल्या कथेला मिळालेला राष्ट्रीय सन्मान आहे, अशी भावना ‘गोंधळ’चे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता संतोष डावखर यांनी व्यक्त केली आहे.


























































