Gold Silver Rate – सोन्याची झळाळी वाढणार, दर दुप्पट होणार; जेफरीजचा मोठा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या सहा महिन्यांच्या चढउतारानंतर आता सोन्याच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जेफरीजचे ग्लोबल हेड ऑफ इक्विटी स्ट्रॅटेजी ख्रिस वूड यांनी सोन्यासाठी एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते आगामी काळात सोन्याची किंमत दुप्पट होऊ शकते.

ख्रिस वूड यांच्या मते, सोन्याची किंमत प्रति औंस $१०,००० पर्यंत वाढू शकते. ही सध्याच्या पातळीपेक्षा १३०% वाढ आहे. सीएनबीसीच्या अहवालानुसार, यूएस बाँड यील्ड्स नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांमुळे डॉलर कमकुवत होऊ शकतो.त्यामुळे सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.

सध्या, सोन्याचा भाव प्रति औंस सुमारे $४,३४९ आहे आणि जर तो $१०,००० पर्यंत पोहोचला, तर त्यात अंदाजे १३०% ची वाढ दिसून येईल. याचा अर्थ, सोन्याच्या भावात सध्याच्या पातळीच्या अंदाजे २.३ पट वाढ होईल. एमसीएक्सनुसार, येथील सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१.५१ लाख आहे. जर ही वाढ झाली, तर एमसीएक्सवरील सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम सुमारे ₹३.४७ लाखांपर्यंत पोहोचू शकतो.

वुड म्हणाले की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडे व्याजदर लक्षणीयरीत्या वाढवण्याची क्षमता नाही, हे बाजाराला लवकरच लक्षात येईल. त्यांच्या मते, अमेरिकेची वित्तीय तूट इतकी जास्त आहे की देशाला उच्च बॉण्ड यील्ड्स हाताळणे कठीण जाईल. अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या बॉण्ड यील्ड्स कमी करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे डॉलर कमकुवत होईल आणि सोन्याला झळाळी मिळेल.

डॉलर घसरल्यास सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. शिवाय, जर डॉलर दीर्घकाळ कमकुवत राहिला, तर हिंदुस्थानला सर्वाधिक फायदा होईल, कारण भारतीय कुटुंबांकडे मोठ्या प्रमाणात सोने आहे. शुक्रवारी, एमसीएक्सवर १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१६ रुपयांनी वाढून १,५३,४९७ रुपयांवर पोहोचला. चांदीचा भाव २,५६५ रुपयांनी वाढून २,४०,७७० रुपयांवर पोहोचला.वूड यांच्या या अंदाजामुळे वायदे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.