
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील डहाणूच्या चारोटी पुलावर आज दुपारी भीषण अपघात घडला. मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेला केमिकलचा टँकर चारोटी पुलावर आडवा झाला. अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणावर रसायनाची गळती झाल्याने दोन्ही लेनवर काही क्षणांत तब्बल पाच इंचांचा थर जमा झाला. काही वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत गाड्या थांबवून अन्य वाहनांनादेखील रोखले. त्यामुळे मुंबई व गुजरात लेनवर वाहनांच्या दोन किमीच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत वाहतूककोंडी फोडण्यासाठी वाहने सर्व्हिस रस्त्याने मार्गस्थ केली. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
मुंबईच्या दिशेने जाणारा
एनसीडी पॉलिएस्टर केमिकलने भरलेला टँकर भरधाव जात असताना चारोटी उड्डाणपुलावरील डिव्हायडरला धडकला. त्यानंतर टँकर पुलावरच पलटी झाला. टँकरमधून ऑइल पेंट व पॉलिएस्टर आर-६५ प्रकारचे रसायनयुक्त पेंट मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. या अपघातात टँकरचालक गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी त्याला तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रसायनाची गळती सुरू असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणपुलावरील दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या. दोन्ही बाजूंची वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविण्यात आल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
तज्ज्ञ टीमला पाचारण
केमिकल जाडसर असल्याने ते पाण्याने अथवा मातीने बाजूला करता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी बोईसर एमआयडीसीतील तज्ज्ञ पथकाला पाचारण केले. रात्री उशिरापर्यंत हे रसायन बाजूला करण्याचे काम सुरू होते. दरम्यान पोलिसांनी मुंबई व पालघर या दोन्ही लेनवर बॅरिकेड्स लावून वाहतूक सर्व्हिस रोडवरून वळवली आहे.
दोन वर्षापूर्वीही याच ठिकाणी भीषण अपघात
चारोटी उड्डाणपुलावर याच परिसरात सुमारे दोन वर्षांपूर्वी केमिकल वाहतूक करणारा टैंकर पलटी होऊन पुलावरून खाली कोसळला होता. या भीषण अपघातात सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे गुरुवारी पुन्हा याच ठिकाणी केमिकल टैंकर पलटी झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.




























































