जाऊ शब्दांच्या गावा – तरुण तुर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< साधना गोरे
[email protected]

‘लाथ मारीन तिथं पाणी काढीन’ म्हणण्याचं एक वय असतं आणि अर्थातच तो आत्मविश्वास तारुण्यातच असतो. कोणत्याही देशातली क्रांती असो नाहीतर परिवर्तन, त्यात तिथल्या तरुण पिढीचा महत्त्वाचा वाटा दिसतो. आपल्याकडे नुकत्याच झालेल्या ‘जंतर मंतर’वरील आंदोलनातही याच युवा पिढीचा सहभाग होता. तर शीर्षकातील ‘तरुण तुर्क’ला असा परिवर्तनाचा वारसा आहे, तो आपण पाहूच, पण आधी ‘तरुण’ पाहू.

‘तरुण’, ‘युवक’, ‘जवान’ हे शब्द साधारण एकाच अर्थाचे आहेत. पैकी ‘तरुण’ व ‘युवक’ हे शब्द मूळ संस्कृतमधील आहेत. संस्कृत ‘तरुण’चं मराठीत, विशेषतः मराठीच्या बोलींमध्ये ‘तरणा’ असंही रूप होतं. मूल व मोठा माणूस यांच्या मधल्या वयाचा मनुष्य म्हणजे तरुण किंवा तरणा. तरुण कोणाला म्हणावं याविषयी प्रत्येकाची वैयक्तिक मतं असू शकतात; पण त्यात दोन मतं विशेषत्वाने मांडली जातात. काही जण सोळा ते तिशीतल्या मनुष्याला तरुण म्हणतात; तर काही जण चाळिशीपर्यंत तारुण्याचं वय मानतात. असो, तर ‘वयात काय असतं?’ असं म्हणून आपण पुढं जाऊ या. धट्टाकट्टा, जोमदार तरुण या अर्थाने ‘तरणाबांड’, ‘तरणाताठा’ अशीही रूपे मराठीत वापरली जातात. हल्ली हवामान खात्याची पावसाविषयीची सगळी गणितं गंडलेली असलेली तरी परंपरेनुसार पावसाची नक्षत्रं आणि पावसाचं स्वरूप याविषयी शेतकऱ्याचे वर्षानुवर्षे काही ठोकताळे होते. त्यानुसार आपल्या शेतकऱ्याने पावसालाही ‘तरणा पाऊस’, ‘म्हातारा पाऊस’ अशी नावं दिलेली आहेत.. साधारणपणे पुनर्वसू नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ‘तरणा पाऊस’ म्हटलं जातं. कारण तो जोरदार असतो. याउलट पुष्य नक्षत्रातील पावसाला ‘म्हातारा’ म्हटलं जातं. कारण त्यात फार जोर नसतो. काही भागांत तर ‘तरणा पुक’, ‘म्हातारा पुक’ असंही म्हणतात.

लॅटिनमध्ये ‘टेनेर’ (Tener) शब्द आहे. त्याचा अर्थ कोवळा आहे तसा ‘तरणा’ असाही आहे. संस्कृत आणि लॅटिनमधील या शब्दांत कमालीचं साम्य दिसतं. वैदिक संस्कृतमध्ये ‘तरू’ हा शब्द ‘कोवळा’ या अर्थाने वापरला जाई हे इथं विशेष लक्षात घेण्यासारखं आहे. फारसीचं मूळ रूप म्हणजे प्राचीन अवेस्ता भाषेतही Taruna शब्द आहे. आपल्याकडील गुजरातीमध्ये ‘तरुण’, पंजाबीमध्ये ‘तर्न’, सिंधीमध्ये ‘तुरुणु’ अशी रूपं आहेत.

‘तरुण’ याच अर्थाचा संस्कृतमध्ये ‘युवा’ शब्द आहे. युवा म्हणजे तरुण मनुष्य, तर युवन किंवा यौवन म्हणजे तारुण्य. संस्कृतप्रमाणेच प्राचीन अवेस्ता भाषेतही ‘युवन’ हा शब्द याच अर्थाने वापरला गेला आहे. प्राचीन फारसी भाषेत याच अर्थाचा ‘जुऑ’ हा शब्द जवॉ, जवान असा बदलत गेलेला दिसतो. मात्र युवकाचे स्त्रीलिंग युवती होते तसे जवानचे स्त्रीलिंग जवानी होत नाही, तर जवानी म्हणजे तरुणाई, यौवन. मराठीत तरुण, सैनिक या अर्थाने ‘जवान’ म्हटलं जातं. तसंच तारुण्य, शक्ती, हिंमत या अर्थाने ‘जवानी’, ‘ज्वानी’ या शब्दांचा वापर होतो. पण मराठीत हे शब्द संस्कृतमधून न येता फारसीतून आले असल्याचे कृ. पां. कुलकर्णी म्हणतात.

युवा, यौवन हा अर्थ सांगणारा इंग्रजी भाषेतील शब्द म्हणजे यंग, युथ. यांच्यातील ध्वनींचे साम्य लक्षात घेण्याजोगे आहे. इंग्रजीतील जुवनाईल (juvenile) या शब्दाचा अर्थ युवक, जवान असा होतो. त्याचेही जवान शब्दाशी केवढे तरी साम्य आहे.

आता आपण आपल्या शीर्षकाकडे येऊ. मराठीतील ‘तरुण तुर्क’ किंवा हिंदीतील ‘युवा तुर्क’ हा शब्दप्रयोग इंग्रजीतील ‘यंग टर्क’ या वाक्प्रचाराचं हुबेहुब भाषांतर आहे. खरं तर इंग्रजीत हा वाक्प्रचार फ्रेंचमधून आला. 1889 ते 1908 या काळात तुर्कस्तानातील ऑटोमन साम्राज्यात हुकूमशाही राजवट होती. ही राजवट बदलण्यासाठी तिथल्या काही सुशिक्षित तरुणांनी, लष्करी अधिकाऱ्यांनी आणि विचारवंतांनी एक गुप्त संघटना आणि चळवळ सुरू केली. तिला ’यंग टर्क्स’ म्हटलं गेलं. या चळवळीवरूनच इंग्रजी आणि जागतिक राजकारणात ’यंग टर्क’ हा वाक्प्रचार रूढ झाला. हळूहळू त्यातील ‘तुर्कस्तानी तरुण’ हा अर्थ मागे पडला आणि कोणत्याही प्रस्थापित व्यवस्थेला किंवा जुन्या नेत्यांच्या धोरणांना आव्हान देणारा अत्यंत आक्रमक, बंडखोर आणि उत्साही तरुण असा अर्थ प्राप्त झाला.

नाटकवेड्या मराठी माणसाला मात्र ‘तरुण तुर्क’ म्हटलं की, आठवतं ते प्रा. मधुकर तोरडमल यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ हे विनोदी नाटक. त्यातील प्रा. तोरडमल यांनी भूमिका केलेल्या पात्राचे ‘हा, ही, हे, हू’ आठवलं की, आजही हसू आवरत नाही.