
दुष्काळात होरपळणाऱया मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या घरातील दिवे विझत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला दिवे लावत असतील तर त्याने शेतकऱ्यांच्या घरात प्रकाश पडणार आहे का, असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केला. कर्नाटक सरकारप्रमाणे महाराष्ट्रात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी त्यांनी केली.
महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात पहिल्याच अधिवेशनात कुणीही न मागता दोन लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. त्यासोबतच दहा रुपयांत शिवभोजन सुरू केले. या दोन्ही घोषणांची तातडीने अंमलबजावणी केली होती असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. कर्जमाफीचे ऐतिहासिक पॅकेज दिल्याचे सांगणाऱ्या महायुती सरकारने दिलेले साडेतीन रुपये तरी शेतकऱयांच्या खात्यात जमा झाले का, असा टोला त्यांनी लगावला.
नवरात्रीत महाराष्ट्र पिंजून काढणार
दुष्काळी स्थितीबाबत 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे करण्याचा मुहूर्त फडणवीस सरकारने काढला आहे. पण हे पंचनामे कसे होतात, त्यासाठी कसे निकष लावले गेले याची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी नवरात्रोत्सवात शिवसेनेचे आमदार, खासदार महाराष्ट्र पिंजून काढतील, असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
चारित्र्यहनन थांबवा, नाहीतर कायदेशीर पाऊल उचलावे लागेल
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे यांनी त्या प्रकरणाशी ठाकरे कुटुंबाचा दुरान्वयानेही संबंध नाही असे स्पष्ट केले. दिशाला आम्ही ओळखतही नाही, असे सांगतानाच, राजकीय हेतूने प्रेरित होऊन चौकशी करणार असाल तर आता चारित्र्यहनन बस झालं नाहीतर आम्हालाही कायदेशीर पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.



























































