राज्यात 100 टक्के दुष्काळ जाहीर करणे गरजेचे, विरोधकांच्या टीकेनंतर सरकारला जाग; कृषीमंत्र्यांचे स्पष्ट सूतोवाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडा व आसपासच्या भागात दुष्काळी परिस्थितीमुळे लोक हैराण झाले आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यानंतरही सरकार काहीच पावले उचलत नसल्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. या टीकेनंतर सरकारला जाग आली आहे. राज्यात 100 टक्के दुष्काळ जाहीर करणे गरजेचे असल्याचे सूतोवाच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

कृषिमंत्री भरणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना शेतकऱयांच्या स्थितीला पावसाचा खंड जबाबदार असल्याचे सांगितले. गेले 40-50 दिवस पाऊस पडलेला नाही. शेतकऱयांची पिके जळाली आहेत आणि शेती उद्ध्वस्त झाली आहे. अशा वेळी 100 टक्के दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे, असे भरणे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला असून आपणही लवकरच मराठवाडय़ातील जिह्यांचा दौरा करणार असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागाची सविस्तर माहिती घेऊन मुख्यमंत्री दुष्काळ जाहीर करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

चारा छावण्या उघडाव्या लागतील

पावसाअभावी चारा निर्माण होत नाही आणि जनावरांना चारा न मिळाल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना भरणे यांनी, दिवाळीच्या आसपास गुरांना चारा आणि पाण्यासाठी छावण्या उघडण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे सांगितले.

महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देणार

महिला शेतकरी विधेयकामुळे शेतात राबणाऱया प्रत्येक महिलेला शेतकरी म्हणून ओळख मिळाली आहे. आता त्या महिला शेतकऱयांना सरकारकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. शेतमजूर म्हणून किंवा पोल्ट्री, दूध, मत्स्यव्यवसाय यांसारख्या शेतीपूरक व्यवसायांत काम करणाऱया महिलांनाही ‘महिला शेतकरी’ म्हणून ओळखपत्र दिले जाणार आहे. त्याआधारे त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या पीक विमा, कर्ज आणि इतर कृषी योजनांचा थेट फायदा मिळू शकणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.