सुखन : शब्दांच्या सुरांनी सजलेली अविस्मरणीय मैफल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही कार्यक्रम ऐकले जातात, काही पाहिले जातात आणि काही अनुभवले जातात. ‘सुखन हा तिसऱ्या प्रकारात मोडणारा अफलातून अनुभव आहे. उर्दू शायरीची नजाकत, गझलेची मिठास, नज्मची तरलता, सूफी संगीताची अध्यात्मिक ओढ आणि कव्वालीची बेधुंद ऊर्जा यांचा सुरेख संगम म्हणजे ‘सुखन ‘सुखन या पारसी शब्दाचा अर्थ शब्द, भाषण, संवाद, कविता असा होतो. नावाप्रमाणेच हा कार्यक्रम एका जिवंत महफिलीचे रूप घेतो. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर इथे कमी कमी होत जाते. रंगमंचावरून कविता ऐकवली जात नाही, तर कलावंत ती जगतात. एखादा शेर कानावर पडतो आणि क्षणात मनाच्या विस्मृतीत गेलेल्या एखाद्या कप्प्याचे दार अलगद उघडते.

राष्ट्रीय पुरस्कारविजेते अभिनेते ओम भुतकर यांच्या संकल्पना व दिग्दर्शनातून साकारलेल्या या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग १३ ऑक्टोबर २०१५ रोजी पुण्यात झाला एका छोटेखानी मैफलीपासून सुरू झालेला ‘सुखन आज देश-विदेशातील रंगमंचांवर रसिकांची दाद मिळवत आहे.

गालिखनब, फैज, मीर, जौन एलिया, निदा फाजली, साहिर, मजरुह, हसरत आणि शकील यांसारख्या दिग्गज शायरांच्या रचनांसोबत दास्तानगोई, गद्यवाचन, गझल, नज्म आणि कव्वालीची मेजवानी या कार्यक्रमात मिळते. ओम भुतकर यांचे मिश्कील, साहित्यसंपन्न निवेदन आणि कलाकार-गायक-वादकांची सक्षम साथ हे ‘सुखन चे वैशिष्टय प्रकाशयोजना, ध्वनी आणि रंगमंच योजना वातावरणनिर्मितीला पूरक ठरतात.

मराठी मातीतल्या कलाकारांनी उर्दू शायरीला दिलेली ही आपुलकीची रंगमंचीय भेट हा रसिकांसाठी एक अविस्मरणीय सांस्कृतिक अनुभव ठरतोय इथे शब्दांना सूर मिळतात, सुरांना भावना मिळतात आणि भावनांना प्रेक्षकांची दाद मिळते प्रत्येकाने आवर्जून घ्यावा असा हा अद्वितीय अनुभव आहे.