आभाळमाया – खगोल अभ्यास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< वैश्विक
[email protected]

आज 17 सप्टेंबरला जागतिक खगोल दिवस मानलं गेलंय. तशी या दिवसाची संकल्पना 1973 मध्ये डॉ. बर्गर यांनी मांडली. ते उत्तर कॅलिफोर्नियाच्या खगोल-संस्थेचे अध्यक्ष होते. वर्षातून दोन वेळा दोन मोसमात खगोल दिवस असावा असं त्यांना वाटलं. त्यांच्याकडच्या वसंत ऋतुमधला खगोल दिन 17 सप्टेंबरला, तर दुसरा एप्रिलमध्ये असं ठरलं. परंतु याला ‘युनेस्को’ वगैरे जागतिक संस्थांचा दुजोरा नाही. कारण जगात विविध देशांत खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे अव्यावसायिक खगोल अभ्यासकही असतात. त्यांच्यापैकी काही धूमकेतू, अशनींचे शोधही लावतात. त्यामुळे त्यांचं महत्त्वसुद्धा व्यावसायिक खगोल वैज्ञानिकांसारखंच असतं. कदाचित त्यातूनच पुढे व्यावसायिक खगोल अभ्यासक घडतात. हा आमच्या ‘खगोल मंडळा’चा गेल्या चार दशकांतला यशस्वी अनुभव आहे.

खगोलीय अभ्यासाची आवड आणि प्रत्यक्ष आकाशदर्शन याची सांगड घालून तयार केलेला सुटसुटीत अभ्यासक्रम ‘आवड’ म्हणून पूर्ण करणाऱ्या अनेकांमध्ये याच विषयाची व्यवसायासाठी निवड करण्याची उर्मी उत्पन्न होते. हे अशा अव्यावसायिक संस्थाचं मोठं यश. मुंबईचं खगोल मंडळ, पुण्याची ज्योतिर्विद्या संस्था, बंगळुरूची हौशी अभ्यासकांची संस्था अशा अनेक संस्था देशभर आहेत. उत्तर आणि उत्तर-पूर्व हिंदुस्थानातल्या तरुणाईलाही अथांग अवकाश कसं साद घालतं ते आम्हाला राष्ट्रीय सेमिनारसारख्या कार्यक्रमातून समजतं. 31 मे रोजी देशाच्या पंतप्रधानांनी आधी उल्लेख केलेल्या संस्थांची दखल त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात घेतली हे विशेष.

सरकार आणि समाज दोघांचाही सहभाग असेल तर संविधानात उल्लेखिलेल्या वैज्ञानिक जाणिवेचा प्रसार होईल. आधुनिक काळात विज्ञान वाढतंय. त्याचा वेग अफाट आहे. रचनात्मक कार्यासाठी त्याचा उपयोग करून घेणं आपल्या सर्वांच्या हाती आहे. त्यातही खगोलशास्त्राचा अभ्यास आपल्याला ‘विश्व परिचय’ घडवतो. खऱ्या अर्थाने आपण मुळातच ‘वैश्विक’ असल्याची जाणीव करून देतो. विश्वामध्ये एका ठिपक्याएवढाही नसलेल्या पृथ्वी नावाच्या ग्रहावरचं आपलं अस्तित्व जेव्हा विश्वाचा धांडोळा घेऊ लागतं तेव्हा माणसाच्या मेंदूची किमया ध्यानात येते. त्याविषयी सखोल ‘विचार’ मात्र कुणी करत नाहीत ही आमच्यासारख्यांची खंत असते.

अशावेळी अनेक वैज्ञानिक दिवसांच्या निमित्ताने जग विज्ञानाबाबत सजग बनत असेल तर ते चांगलंच. तसं झालं तर वैज्ञानिक संशोधनांच्या बऱ्या-वाईटचाही जग साकल्याने आढावा घेत राहील. विश्वाचा अभ्यासही पृथ्वीच्या कल्याणासाठीच असतो. अशाच अभ्यासातून अवकाशातील काही धुमकेतू किंवा अशनींचे संभाव्य धोके समजू शकतात. अवकाशयानं पाठविण्याने पृथ्वीवरची साद्यंत माहिती समजते. आपला ग्रह आपल्याला नित्यनव्याने कळत राहतो. तरुणाईला सकारात्मक काम आणि ऊर्जा मिळते. वैश्विक अभ्यासासाठी आपली पृथ्वी आपल्याला सर्वात आधी जपायला हवी. निरोगी ठेवायला हवी याचं भान येऊ शकतं.

खगोलीय अभ्यास म्हणजे केवळ ग्रह-ताऱ्यांची गणती नव्हे. ती तर आवश्यक आहेच, पण त्यापलीकडे खगोलभौतिकीचा (अॅस्ट्रॉफिजिक्स) अभ्यास करताना विश्वरचनेची कोडीही उलगडतात. पृथ्वीवरच्या दुर्बिणींमधून जेवढं विश्व आपल्याला दिसतं नि समजतं त्यापेक्षा कैक पटींनी हबल किंवा जेम्स वेबसारखे अवकाशी टेलिस्कोप ‘प्रत्यक्षदर्शी’ माहिती पाठवत असतात. 1957 मध्ये रशियाच्या स्पुतनिक -1 हा कृत्रिम उपग्रह अवकाशात गेल्यानंतरच्या गेल्या सुमारे 70 वर्षांत आपलं ‘विश्व’ आपण शोधतच आहोत. गंमत म्हणजे हे विराट विश्व हा एकूण विश्वाचा अवघा चार टक्के भाग आहे.

आपल्याकडे 23 ऑगस्ट हा ‘नॅशनल स्पेस डे’ असतो. चांद्रयान-3च्या यशानंतर तो सुरू झाला. पण अमेरिकेत जसा दोनवेळा खगोलीय दिवस असतो तसा तो हिंदुस्थानात 23 डिसेंबरला साजरा करणं उचित ठरेल. याचं कारणं असं की या दिवशी आपल्याकडे रात्र सर्वात मोठी आणि दिवस सर्वात लहान असतो. याच्या उलट स्थिती जुलैमध्ये येते. डिसेंबरमध्ये आणखी अनुकूलता म्हणजे अवकाश दर्शनासाठी ऋतू स्वच्छ, निरभ्र आकाशाचा असतो. बदलत्या ऋतुचक्रात एकूणच ऋतूंचा भरवसा नसला तरी पावसाळ्यापेक्षा डिसेंबर महिना खगोल अभ्यासाला उत्तमच असतो.

खरं तर 22 डिसेंबर ते 14 जानेवारी असा खगोलीय जाणीव जागृतीचा काळ ठरवला तर संक्रांतीला दिवसा सोलर फिल्टर वापरून सूर्यदर्शनाचे कार्यक्रम करता येतील. थोडक्यात असं की त्या त्या देशातील हवामानानुसार अव्यावसायिक खगोल अभ्यासकांसाठी कार्यक्रम आयोजित केले गेले पाहिजेत. ते करताना गेल्या 40 वर्षांत आम्हाला खूप चांगले अनुभव आलेत. खगोलाचा अभ्यास म्हणजे विश्वाचा म्हणजेच सूर्यासह ग्रहमालेचा आणि पृथ्वीचा तसंच पर्यायाने आपल्या स्वतःचा. कारण आपण सर्व ‘विश्वांकित’ जीव आहोत. याचं भान आलं तर मानसिक उदात्तताही प्राप्त होऊ शकते. विराट विश्वातील ‘आपला’ सहभागच सर्वात महत्त्वाचा आहे ही सुखद जाणीव जागृत मात्र करायला पाहिजे. हे पावसाळा सरत असताना लिहिलं. कारण दिवाळीपर्यंत तयारी करता येईल. कशी ते पुढच्या काही लेखात पाहू.