
सांगली जिह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहेत. गणेशोत्सवाची धामधूम संपताच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी बँकेवरील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांना सोबत घेऊन सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चेच्या फेऱया सुरू केल्या आहेत. दुसरीकडे भाजपच्या पॅनलबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
मागील महिन्याभरापूर्वीच आमदार जयंत पाटील यांनी बँकेच्या आगामी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीच्या ठरावासाठी आपले नाव समाविष्ट व्हावे, यासाठी काही सहकारी संस्थांच्या संचालकांवर दबाव आणण्यात आल्याचे प्रकार समोर आले. काही ठिकाणी माणसे पळवून नेणे आणि दहशतीच्या वातावरणात ठराव करण्याचे प्रकार घडले. सांगली जिह्यात यापूर्वी निवडणुका खुलेपणाने आणि लोकशाही मार्गाने लढण्याची परंपरा राहिली आहे. माणसे पळवून नेणे अथवा दहशतीच्या जोरावर सत्ता मिळविण्याची प्रथा जिह्यात कधीच नव्हती. मात्र, अशा प्रकारांना सुरुवात झाली तर ते सहकारासाठी अत्यंत घातक असल्याचा इशारा देत बँकेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली.
मागील पाच वर्षांत बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने चांगले काम केले आहे. बँकेचा कारभार उत्तम सुरू असतानाही काही मंडळींनी बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली. आता गणेशोत्सवानंतर निवडणूक जाहीर होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. मागील पंचवार्षिक निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगली होती.
जिल्हा बँकेच्या वाटचालीत खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांचीही चांगली साथ मिळाली. त्यामुळे त्यांच्यासोबत समेट कायम ठेवून जयंत पाटील यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे तीन संचालक आहेत, त्यांनी पुन्हा तीन जागांची मागणी सत्ताधारी नेत्यांकडे केली आहे. रिझर्व्ह बँकेने 10 वर्षे पूर्ण झालेल्यांना पुन्हा लढण्याची संधी मिळणार असल्याने काही संचालक पुन्हा दिसणार आहेत. जयंत पाटील यांनी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांसोबत ही सकारात्मक चर्चा केल्याचे समजते. काही तालुक्यात त्यांनी नेते आणि मतदारांशी संवाद साधला आहे. त्यामुळे गतवेळी झालेले आघाडीचे पॅनेल यंदाच्या निवडणुकीत दिसणार आहे.
पॅनेलबाबत भाजपमध्ये संभ्रम
सांगली जिह्यातील भाजप आणि मित्र पक्षाच्या आमदारांनी जिल्हा बँकेतील काही प्रकरणावरून सत्ताधारी गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांना टार्गेट केले. नोकरभरती असो अथवा कर्ज प्रकरणावरून जिल्हा बँकेला वेळोवेळी सहकार विभागाच्या माध्यमातून नोटीसा पाठवून संचालकांची कोंडी केली. बँकेत भाजपचे संचालक असूनही त्या आमदारांमुळे मुख्यमंत्र्यांपर्यंत बँकेची भूमिका पाठवून देण्यात अपयश आले. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असली, तरी भाजपमध्ये पॅनेलबाबत संभ्रमावस्था आहे आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोणती भूमिका घेणार यावर भाजपची गणिते अवलंबून आहेत.





























































